छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस गैरहजर, अजित पवारांचा टोला
मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवाला गैरहजेरी लावणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. “महाराष्ट्राची एक संस्कृती आणि परंपरा आहे. अनेक वर्षे आपण अनेक मान्यवरांचे सत्कार पाहत आलो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते आणि राजकीय मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेऊन तेही छगन भुजबळांबाबत बोलले असते, तर महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा अधिक ठळकपणे समोर आला असता.”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार पडला.
अजित पवार म्हणाले, “छगन भुजबळ एखाद्या कामात लक्ष घातल्यावर जीव ओतून काम करतात. राजकीय घडामोडी होतात, चढउतार येतात, परंतु त्यात डगमगायचं नाही. छगन भुजबळांवर कुठलेकुठले आघात घडलेत ते सर्वांना माहिती आहे. मी त्याच्या खोलात जाणार नाही. एक गोष्ट मी जरूर सांगतो, एखाद्या दुसऱ्या नेत्यावर तसे आघात झाले असते, तर तो नेता खचून गेला असता, घरी बसला असता, त्याने राजकारण सोडलं असतं. परंतु, छगन भुजबळांनी तसं केलं नाही. त्यांनी हे सर्व सहन केलं आणि पुन्हा नव्या उमेदीने जनतेची काम करण्याचा ध्यास मनात ठेवला. छगन भुजबळ पहिल्यांदा मुंबईचे महापौर झाले. तेव्हा बॉम्बेचं मुंबई नाव करताना त्यांचा फोटो प्रत्येक मुंबईकराच्या आणि महाराष्ट्रवासीयाच्या मनावर कोरला गेला,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.