uddhav Thackeray

उद्धव ठाकरे म्हणाले, “जर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर….”

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: “महाविकास आघाडी सरकराला चार महिने अधिक मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असं अजित पवार म्हणाले. त्यावर शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मी अजित पवारांच्या वक्तव्यात थोडी सुधारणा करतो. जर भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर त्याच्या आधीच ते मुख्यमंत्री झाले असते”. या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर कुटुंबाला झालेला त्रास याची आठवण करुन देताना, त्यांच्या कारकिर्दीचं कौतुकही केलं. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन मिश्कील टोलाही लगावला.

“नियतीच्या मनात काय असतं हे कोणालाही माहिती नसते. पण आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची नियतीची इच्छा आहे,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी यावेळी शिंदे गटाला लक्ष्य केलं. पुढे ते म्हणाले “सरकार वाचवण्यात ते किती हुशार आहेत हे आत्ता तुम्ही मला सांगत आहात, तेव्हाच सांगायला हवं होतं. मी पण त्यांना कामाला लावलं असतं,” आता आम्ही धक्काप्रूफ झालो आहोत. पण भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा आमच्या कुटुंबाला सर्वात पहिला मानसिक धक्का बसला होता. बाळासाहेब, माँ आणि आम्हालाही बसला होता. आपल्या कुटुंबातील माणूस सोडूनच कसा जाऊ शकतो हाच मोठा धक्का होता. राग वैगेरे हा तर राजकारणाचा भाग झाला, पण आपला माणूस जाणं मोठा धक्का होता. त्यातून मानसिकदृष्ट्या सावरताना आम्हाला वेळ लागला,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.