खासगी बस, ट्रॅव्हल्स चालकांकडून सणासुदीत होणारी बेकायदेशीर भाडेवाढ, आर्थिक लूट थांबवावी: युवक काँग्रेस
याबाबत बोलताना प्रथमेश आबनावे म्हणाले, “दिवाळी सणासाठी पुण्यातून बाहेरगावी खाजगी बस आणि ट्रॅव्हल्स तर्फे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात विद्यार्थी आणि नोकरदार अधिक आहेत. सणाच्या तोंडावर केलेली ही भरमसाठ भाडेवाढ यामुळे दिवाळी साजरी करण्याआधीच दिवाळे निघेल, अशी परिस्थिती आहे. अशाने अराजकता माजेल. तसेच खाजगी वाहनांना खाजगी बसेस आणि ट्रॅव्हल्सला भाडे निश्चिती मोटार अॅक्टनुसार करण्यात आली असून, ती एसटी भाड्यापेक्षा ५० टक्के अधिक आहे. म्हणजेच एसटीचे भाडे २०० असेल, तर खाजगी बस चालकांना तीनशे रुपये तिकीट घेता येते. त्यामुळे वेळीच प्रशासनाने यात लक्ष घालावे आणि अकारण भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी,” प्रशासनाने संबंधितांवर योग्य वेळेत कारवाई करावी अन्यथा १८ ऑक्टोबरला तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही आबनावे यांनी दिला.
युवक काँग्रेसच्या मागण्या
– ज्यादा भाडे आकारणी करणाऱ्या बस चालकांची नोंदणी रद्द करा
– नियमानुसार भाडे आकारणी दरपत्रकाची जागृती करणारे फलक लावा
– तक्रार आल्यास शहानिशा करून प्रवाशाला २४ तासात न्याय द्या
– पथक तयार करून भाडे आकारणीतील अनियमितता तपासा
– अवास्तव भाडे आकारणाऱ्या बस, ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करा