मोठी बातमी! शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं
मुंबई, १० आॅक्टोबर २०२२ ः मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून रस्सीखेच सुरू आहे. आपल्या पक्षाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव मिळावं, अशी मागणी दोन्ही गटांकडून केली होती. आज अखेर निवडणूक आयोगानं ‘बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिलं आहे.
दुसरीकडे, निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्हांबाबतही निर्णय दिला आहे. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिलं आहे. पण शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली आहेत. पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिली आहेत. शिंदे गटाने उद्या सकाळपर्यंत तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत, त्यानंतर शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत आयोग निर्णय घेणार आहे.
अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी जाहीर केला. या निर्णयानुसार अंधेरीतील पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला नुसतं शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. या निर्णयानंतर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.
‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेकडून रविवारी उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हाचा तर, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे, अशा तीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर सोमवारी शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची तर, शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गट ठाकरेंची कोंडी करण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचं दिसत आहे. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह दिले आहे. शिंदे गटाने दिलेले पर्याय फेटाळण्यात आले असून, नव्याने प्रस्ताव देण्यास सांगितले आहे.