कामगारांच्या कल्याणार्थ चांगल्या प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करावेत -कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
पुणे, 07 ऑक्टोबर 2022: कामगारांच्या कल्याणार्थ चांगले प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. कामगारांच्या मुलांसाठी क्रीडांगण निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासह प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिका, जलतरण तलाव, महिलांसाठी शिवणकला वर्ग, कौशल्य विकास आदी सोयीसुविधा टप्प्या टप्प्याने निर्माण केल्या जातील अशी ग्वाहीदेखील डॉ. खाडे यांनी दिली.
साखर संकुल पुणे येथे आयोजित कामगार कल्याण मंडळ, माथाडी कामगार मंडळ, राज्य कामगार विमा हॉस्पिटल व सुरक्षा रक्षक मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अपर कामगार आयुक्त अभय गिते, कामगार कल्याण मंडळाचे सहायक कल्याण आयुक्त समाधान भोसले, राज्य कामगार विमा हॉस्पिटलचे रविंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
श्री. खाडे म्हणाले, कामगारांच्या कल्याणकारी योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कामगारांच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात जागा उपलब्ध करून क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच अन्य सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध केला जाईल. सर्व कामगारांची नोंदणी करणे तसेच कामगारांचा डेटा अद्यावत असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
माथाडी कामगारांचे हक्क त्यांना मिळावेत
माथाडी कामगार मंडळाच्या आढावा बैठकीत श्री. खाडे म्हणाले, जास्तीत जास्त कंपन्यांनी माथाडी अधिनियमानुसार नोंदणी करावी. ज्या कंपन्या माथाडी कामगारांचा वापर करत नाहीत त्यांची यादी बोर्डाने सादर करावी. कामगारांसाठी चांगल्या योजना राबवाव्यात. कंपनी मालकाकडून १०० टक्के लेव्ही कर येणे आवश्यक आहे, त्यासाठी बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. माथाडी कामगारांचे हक्क त्यांना मिळायलाच हवेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
राज्य कामगार विमा हॉस्पिटलच्या बैठकीत श्री. खाडे म्हणाले, बिबवेवाडी येथे कामगार रुग्णालयाचे काम सुरु असून या परिसरातील अतिक्रमण पोलिसांची मदत घेवून हटवण्यात यावे. या हॉस्पिटलचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी कार्यवाही करावी.
राज्य सुरक्षा मंडळाच्या बैठकीत बोलताना श्री. खाडे म्हणाले, सुरक्षा रक्षकांचा प्रॉव्हिडंट फंडाची कपात झाली पाहिजे. कामगारांना कायद्यानुसार सर्व लाभ गतीने मिळतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी प्रत्येक विभागाने सादरीकरणाने माहिती दिली. बैठकीस पुणे विभागातील सर्व सहायक कामगार आयुक्त, माथाडी कामगार मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.