साश्रू नयनांनी ‘दादा’ अनंतात!
बारामती, 29 जानेवारी 2026: “सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात ज्यांच्या आवाजाचा दरारा होता, तो लोकनेत्याचा बुलंद आवाज आज कायमचा शांत झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न असतानाच, आज लाखो डोळ्यांतून वाहणाऱ्या आसवांच्या साक्षीने ‘दादा’ अनंतात विलीन झाले. ‘अमर रहे, अमर रहे’च्या गगनभेदी घोषणा आणि कार्यकर्त्यांच्या काळजाला भिडणाऱ्या हुंदक्यांनी बारामतीचा आसमंत सुन्न झाला होता. एका धडाडीच्या नेतृत्वाचा हा आकस्मिक प्रवास असा संपल्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.”
बुधवारी सकाळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर काळाने झडप घातली आणि नियतीने महाराष्ट्राचा एक कर्तबगार ‘कारभारी’ हिरावून नेला. आज सकाळपासूनच बारामतीची हवा जड झाली होती. लाडक्या भूमिपुत्राचे पार्थिव शेवटच्या वेळी आपल्या मातीत, काटेवाडीत पोहोचले, तेव्हा प्रत्येक घराचा उंबरठा ओलावला होता. गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या ‘कर्त्या’ माणसाला जड अंतकरणाने निरोप दिला. त्यानंतर दुपारी पावणे बाराच्या सुमारास जेव्हा पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आले, तेव्हा संयमाचा बांध फुटला.
मंत्रोच्चार अन् अश्रूंचा अभिषेक विद्येच्या या प्रांगणात जिथे दादांनी हजारो स्वप्ने फुलवली, तिथेच आज त्यांच्या आयुष्याची अखेरची आहुती देण्यात आली. पार्थ आणि जय या दोन्ही पुत्रांनी मंत्रोच्चारात अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण केले. ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचे दुःख शब्दांत मांडण्यापलीकडे होते. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि उपस्थित नातेवाईकांनी साश्रू नयनांनी दादांचे अंतिम दर्शन घेतले.
देशाचा ‘सलाम’ आणि महाराष्ट्राची ‘श्रद्धांजली’ देशाच्या राजकीय पटलावरील अनेक दिग्गज आज बारामतीमध्ये नतमस्तक झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांपासून ते विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच पुष्पचक्र अर्पण करून या ‘कामाच्या माणसाला’ श्रद्धांजली वाहिली. पक्षाचे मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची मांदियाळी आज केवळ एका नात्यासाठी इथे जमली होती—ते नातं होतं ‘दादा’ नावाच्या विश्वासाचं.
“आमचा आधार गेला…” बारामतीच्या या मैदानात आज केवळ माणसे नव्हती, तर भावनांचा महापूर होता. कोणी ट्रकच्या टपावर, तर कोणी झाडांवर चढून आपल्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी आसुसले होते. “आमचा आधार गेला… आमचा दादा गेला,” अशा भावना व्यक्त करताना रांगड्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतूनही धारा वाहत होत्या. ‘एकच वादा, अजित दादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला खरा, पण त्या प्रत्येक घोषणेत आज एक अतीव वेदना होती.
शिस्तप्रिय नेत्याला शिस्तीचाच निरोप सकाळी आठ वाजल्यापासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून जनसागर बारामतीत लोटला होता. कडक पोलीस बंदोबस्त असूनही, केवळ दादांच्या शब्दाखातर शिस्त पाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी आजही जमिनीवर शांत बसून आपल्या नेत्याची वाट पाहिली. अंत्यविधी आटोपल्यानंतरही हा जनसागर तिथून हलण्यास तयार नव्हता. महाराष्ट्राच्या विकासाचा एक महामेरू आज काळाच्या पडद्याआड गेला, पण जाताना लाखो मनांत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करून गेला.