शिंदे गट पात्र होणार की अपात्र – राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे लक्ष

मुंबई, १० जानेवारी २०२४: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. आज या प्रकरणात नार्वेकर निकाल देणार आहेत. आमदार पात्र राहणार की अपात्र होणार हे आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजच्या या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणात निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. आज या मुदतीचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे नार्वेकर यांना आता आणखी वेळकाढूपणा करता येणार नाही. आज कोणत्याही परिस्थितीत निकाल द्यावाच लागणार आहे. असे असले तरी ऐनवेळी आणखी काही अनपेक्षित राजकीय घडामोडी घडतात का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल आज दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत. यासंदर्भात मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे ज्येष्ठ नेते काल वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते.

महायुतीच्या सरकारसमोर मराठा आरक्षण आणि आजचा निकाल हे दोन मोठे प्रश्न आहेत. विधानसभा अध्यक्षांचा निकाल काय असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. आजच्या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलू शकेल का? याची देखील उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. या निकालाचे पडसाद राज्यात उमटले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्ना निर्माण झाला तर त्यावरील उपाययोजनांसाठी ही बैठक आयोजित केली होती.