अजित पवारांना उमेदवार का आयात करावा लागला ? – खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल
पुणे, २७ मार्च २०२४: राष्ट्रवादी कॉँग्रेसला (अजित पवार गट) शिरूर लोकसभा मतदारसंघात साधा उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांना माझ्याविरुद्ध लढण्यासाठी अन्य पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. उमेदवार आयात करावा लागणे, हाच खासदार शरद पवार यांचा विजय असल्याचे मत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना उमेदवार मिळाला नाही. आतापर्यंत अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना एका मंगल कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात पक्षात प्रवेश द्यावा लागला, याबद्दल आश्चर्य वाटते,’ असा टोला त्यांनी यावेळी अजित पवार यांना लगावला.
डॉ. कोल्हे म्हणाले, “काका डॉक्टर म्हणून मी डॉक्टर झालो नाही. काका अभिनेता म्हणून मी अभिनेता झालो नाही. डॉक्टर, अभिनेता आणि नंतर खासदार होण्यात माझे कष्ट आहेत. शेतकऱ्यांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या मुलांनी राजकारणात यायचेच नाही का?. अजित पवार यांनी आढळरावांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली. पण कांदा निर्यात बंदी, बिबट्याचे हल्ले याबद्दल चकार शब्द काढला नाही, हे दुर्दैव आहे.”