जरांगे इफेक्ट: सकल मराठा समाजातर्फे वसंत मोरे लढणार लोकसभा

पुणे, २६ मार्च २०२४ : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे शहर लोकसभा मतदार संघातून उमेदवार उभा करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी समाजाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना अर्जाचे वाटप करण्यात आले. या बैठकीला वसंत मोरे उपस्थित होते त्यांनी देखील अर्ज मिळाल्याने सकल मराठा समाजातर्फे वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे लक्ष लागलेली आहे.

आंतरवाली सराटी (ता. अंबड ) येथे रविवारी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक झाली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा बांधवांनी एकत्र बैठक घेऊन चर्चा करावी. त्यामध्ये सर्वांना विश्‍वासात घेऊन एक उमेदवाराचे नाव निश्‍चित करून ३० मार्च पर्यंत पाठवावे. त्यांनतर त्या दिवशी उमेदवाराचे नाव घोषित करण्यात येईल, असे देखील ठरले होते.

त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पुणे शहरातील सकल मराठा समाजाची बैठक डेक्कन जिमखाना येथील एका मंदिरात झाली. या बैठकीला शहरातील मराठा समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या बैठकीत चर्चा होऊन पुणे शहर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज भरून घ्यावेत. त्यानंतर समाजाच्या पुण्यातील समन्वयकांमार्फत ते सर्व अर्ज ३० मार्च पर्यंत जरांगे पाटील यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. समन्वयक आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा होऊन ते ज्या इच्छुकाचे नाव घोषित करतील, त्याच्या पाठीशी सर्व समाजाने एकजुटीने उभे राहावे. तसेच ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवावी, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बैठकीमध्ये अर्जाचे वाटप करण्यात आले.

या बैठकीला सर्वच पक्षिय समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे शहर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले वसंत मोरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील इच्छुकासाठीचा अर्ज नेला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.