शिंदे गट गुवाहाटीला कोणाचा बळी देणार ? – विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
पुणे, २५ नोव्हेंबर २०२२ : ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो. शिंदे गट आता कोणाचा बळी द्यायला गुवाहाटीला चालले आहेत,’’ असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सत्तांतराचे नाट्य गुवाहाटीत घडले होते. त्याठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. यावर पवार म्हणाले, ‘‘देवदर्शनाला जात असतील तर शुभेच्छा आहेत. काही ठिकाणी कोंबड्याचा, बकऱ्याचा बळी देतात. परंतु कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात, ते कोणाचा बळी द्यायला जात आहेत, माहीत नाही.’’
‘ज्यावेळी लोक सांगतात, विरोधी पक्षात बसा त्यावेळी विरोधी पक्षात राहून काम करावे लागते. पुन्हा लोकांनी जर सत्तेत बसण्याची जबाबदारी दिली तर पालकमंत्री म्हणून बसणारच आहोत,’’ अशी टिपण्णीही पवार यांनी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद करण्याची वेळ येऊ देवू नका, असा इशारा दिला होता. त्यावर ठाकरे यांच्या आवाहनाला आपला ‘सकारात्मक प्रतिसाद’ राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले.