भाजपला खाली खेचायची आमच्यात ताकद: महादेव जानकर
पुणे, २९ ऑगस्ट २०२३: ‘‘राज्यात भाजपने मित्रपक्ष फोडले. काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी छोट्या पक्षांना संपविण्याचे काम केले. ज्यांना आम्ही सत्तेत बसविले त्या भाजपला खाली खेचायची ताकद देखील आमच्यात आहे’’, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला.
‘राष्ट्रीय समाज पक्षा’च्यावतीने काढण्यात आलेल्या जनसुराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज पुण्यात झाला. त्यानंतर पक्षाचा २० वा वर्धापनदिन सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात आला. त्यात जानकर बोलत होते. पक्षाचे अध्यक्ष एस. एल. अक्की सागर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, आमदार रत्नाकर गुट्टे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजित पाटील, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष गणेश लोंढे, जिल्हाध्यक्ष विनायक रूपनवर, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर यांच्यासह रासापचे दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, राजस्थानमधून आलेले पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जानकर म्हणाले, ‘‘पक्षाचा विस्तार करीत रासपची दिल्ली आणि राज्यात सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या २० वर्षाच्या कार्यकाळात मतदारांनी रासापचे चार आमदार, ९५ जिल्हा परिषद सदस्य आणि बंगळूर, आसाम व गुजरातमध्येही लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या देशातील ५४३ जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करताना सर्व जातीच्या आणि समाजाच्या लोकांना सोबत घेवू. सत्तेत आल्यानंतर सर्वांना समान वाटा देऊ,’’ असेही जानकर म्हणाले.
आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, ‘‘परभणी जिल्ह्यात आपले संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आम्ही नक्कीच रासपचा झेंडा फडकत. त्यामुळे परभणीत आम्ही कोणासोबत युती करणार नाही. तसेच जानकर परभणीतून लोकसभा लढले तर आपण पूर्ण ताकद लावू आणि त्यांना लोकसभेत पाठवू’’.