“वागळे स्वस्तात परत गेला” – नितेश राणे यांचे पुण्यात चिथावणीखोर वक्तव्य

पुणे,१२ फेब्रुवारी २०२४:  ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. त्यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुण्यात चिथावनीखोर वक्तव्य केले आहे. “निखील वागळे हा कुणी पत्रकार नाही, तो स्वस्तात परत गेला, पुणे भाजपचं काम अपूरं असून त्यांनी ते पूर्ण करावं, नाहीतर मला बोलवा” अशी धमकी राणे यांनी दिली.

भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी नितेश राणे पुण्यात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले, निखिल वागळे हा कुठलाही पत्रकार नाही. त्याला पत्रकार म्हणून तुम्ही स्वतःचा अपमान करून घेऊ नका. ती विकृती आहे. तो फार स्वस्तात वापस गेला. पुणे भाजपाचे काम अपूर्ण राहिलं आहे, काम पूर्ण करा. नाहीतर मला बोलून घ्या, ते पूर्ण आपण करू.”

पुण्यात वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचे देशभर पडसाद उमटले आहेत. भाजपवर सर्व स्तरातून टीका होत असताना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी शहर भाजप व प्रदेश स्तरावरच्या नेत्यांना या संदर्भात तुम्ही कोणाच्या आदेशाने हे आंदोलन केले आहे? असा जाब विचारला आहे. त्यामुळे शहर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असताना आता राणे यांनी केलेल्या भडक वक्तव्यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

शेंबूड पुसायला बोलवत नाही
विरोधी पक्षातील नेत्यांचा भाजप प्रवेश होत असल्याबद्दल राणे म्हणाले, ‘जे कोणी नेते भाजपमध्ये येत आहेत त्यांना आम्ही त्यांचा शेंबूड पुसण्यासाठी बोलवत नाही. तर त्यांना त्यांचे भविष्य कुठे आहे हे माहिती आहे त्यामुळे ते येत आहेत. अशोक चव्हाण हे मोठे नेते असून त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. ते पक्षप्रवेशाबाबत योग्य ते निर्णय घेऊ शकतील. त्यांनी काँग्रेस सोडण्याबाबत अनेक कारण असू शकतील आम्ही देखील काँग्रेस सोडताना काही कारणे होती.