
मुंबई महापालिके विरोधात उद्धव ठाकरे गट न्यायालयात
मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजिनामा मंजूर न केल्याने या भूमिकेविरोधात लटके यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. पालिकेला राजीनामा स्वीकारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे. या याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे गटातील उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना त्यांचा पालिका नोकरीचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. याच कारणामुळे उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांच्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांचा पालिका नोकरीच्या राजीनाम्याचा अर्ज अद्यापही स्वीकारण्यात न आल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिका प्रशासनाने राजीनामा स्वीकारावा यासाठी त्यांनी एका महिन्याचे वेतन पालिका कोषागारात भरलेले आहे. तसेच राजीनाम्याचा रितसर अर्जही केलेला आहे. मात्र तरीदेखील त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीविषयी भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी पक्षादेश पाळणार आहे. पक्षाने सांगितले तर निवडणुकीतून माघार घेईन, असे मुरजी पटेल यांनी म्हणाले आहेत. असे असतानाच भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या उमदेवरी अर्जावर खुद्द पटेल यांनीच भूमिका स्पष्ट केली आहे.