धमकी देऊन आवाज बंद होऊ शकत नाही – शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
पुणे, ९ जून २०२३ : कुणी धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद करू शकेल असं वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धमकीला उत्तर दिले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धमकी देणार्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.
पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली. “तुमचा दाभोळकर होणार,” असं ट्वीट करत ही धमकी देण्यात आली. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत तक्रार दिली. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. आता स्वतः शरद पवारांनी यावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले, “राज्याच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रश्नावर मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुणी धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद करू शकेल असं वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. याची जबाबदारी महाराष्ट्र प्रशासनावर आहे.”
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था सांभळणाऱ्या पोलीस दलाच्या कर्तुत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. ज्यांच्या हातात राज्याची सूत्रं आहेत त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.
शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्ष राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि गृह विभागावर टीका करत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी परंपरा आहे. आमचे राजकीय पातळीवर मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर कोणतेही मनभेद नाहीत.”
सोशल मीडियावर व्यक्त होत असताना कोणत्याही नेत्याला धमकावणं किंवा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणं ही बाब खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकरणात पोलीस नक्कीच कायदेशीर कारवाई करतील,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप