खड्ड्यांवरून ठाकरे गटाने भाजपला केले लक्ष्य – पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात ही अवस्था असेल तर शहराच काय?
पुणे, ता. ५/०८/२०२३: कोथरूड परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून तक्रार करूनही ते बुजविले जात नसल्याचे पत्र भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिले. ‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात ही स्थिती असेल तर शहराच्या इतर भागातील स्थिती विचारायलाच नको’’ असा टोला मारला ठाकरे गटाने भाजपला लक्ष्य केले आहे.
खर्डेकर यांनी अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांना लिहिल्या पत्रात तक्रारींचा पाढा वाचला आहे.
‘‘समान पाणी पुरवठा, मेट्रो यासह विविध कामांसाठी रस्ते खोदल्यानंतर पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्व स्तरांवर त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. खड्डे न बुजविल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा आपण दिला आहे. पण त्यानंतरही खड्डे बुजविले जात नाहीत. कर्वेनगर, एरंडवणे, शैलेश पूल, समर्थ पथ, गिरिजाशंकर विहारकडे जाणारा रस्ता, नळस्टॉप परिसर अशा अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. अनेकांचे अपघात झाले आहेत. पुण्यात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. असा पाऊस झाल्यास रस्त्यांची काय स्थिती होईल याची कल्पनाच करवत नाही. त्यामुळे आपण योग्य कार्यवाही करावी’’, अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.
खर्डेकर यांचे हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी पत्रक काढून भाजपवर टीका केली आहे. ‘पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची ही स्थिती असेल तर शहरातील स्थिती विचारायलाच नको. पाणी पुरवठा योजनेमुळे खड्डे पडले हे भाजपचे पदाधिकारी सांगूनही प्रशासन ऐकत नसले तर यापुढे त्यांना सत्ता द्यायची की नाही, याचाही विचार करावा लागेल. भाजपच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे पुणेकरांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे’, अशी टीका मोरे, बधे यांनी पत्रकातून केली.