मोदींसारखा मोठा नेता असतानाही हिंदूना जन आक्रोश मोर्चा काढण्याची नामुष्की – उद्धव ठाकरे यांचा टोला

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३: जगातला सर्वात मोठा नेता, विश्वगुरु, महाशक्ती असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे काढावे लागत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आज ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, ठाकरे नावाला इतिहास आहे पण टीकाकारांचा इतिहास काय आहे. आमचं हिंदुत्व शेंडीजाणव्याचं नाही. बाळासाहेबांचं वाक्य होतं आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदु नकोय तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु पाहिजे.

देशात तब्बल ९ वर्ष झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ते जगातील सर्वात मोठे नेते, विश्वगुरु, महाशक्ती आहेत. तरीही देशात हिंदुंंना जनआक्रोश मोर्चे काढावे लागत आहे, हेच का तुमचं हिंदुत्व? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला आहे.

 

तसेच मागील ९ वर्षांपासून देशाचे पंतप्रधान मोदी आहेत. तरीही हिंदु खतरे में है म्हणतात तर मग काँग्रेसमध्ये ईस्लाम खतरे में है, अशा घोषणा यायच्या तर खरे हिंदुत्ववादी कोण? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या विविध विषयांवर भाष्य करीत सत्ताधारी पक्षाला चांगलचं धारेवर धरलं आहे. या मेळाव्यात संभाजी ब्रिगेडसह ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.