तानाजी सावंतांचा तोल सुटला; चिडून पत्रकाराच्या गालाला लावला हात

पुणे, २७ नोव्हेंबर २०२३ : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात काय चालले आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. पत्रकारांनी आगीत तेल ओतू नये, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे मराठा आरक्षणाबाबत काय वाटते या प्रश्नावर पत्रकारांवर पुण्यात भडकले. पण यावेळी सावंत यांचा तोल सुटला आणि पत्रकाराच्या थेट गालाला हात लावत शांत करण्याचा प्रयत्न केला.

एका कार्यक्रमानंतर डॉ. सावंत यांना माध्यमांनी विविध मुद्यांवर प्रश्न विचारले. मराठा आरक्षणासंदर्भात डॉ. सावंत यांनी ‘मराठा समाजाला २०२४ पर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मी राजीनामा देईन’, असे वक्तव्य पूर्वी केल्याची आठवण करून देत प्रश्न विचारता ते टाळून निघून जात होते.

तेव्हा पत्रकारांनी पुन्हा ‘तुम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून पळ काढताय का,’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावेळी निघून जात असलेले डॉ. सावंत पुन्हा संबंधित पत्रकाराजवळ आले आणि त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत ‘शांत राहा’, असे सांगितले. त्यावर ‘महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यांवरून काय चालले आहे ते तुम्ही आम्ही पाहत आहोत. त्यामुळे पत्रकारांनी त्या आगीत तेल ओतण्याचे काम करू नये’, असे सुनावत पत्रकाराच्या आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देत त्यांनी संताप व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच लोकसभेच्या जागा वाटपाबाबत भाष्य केले. भाजपा २६ जागा तर उर्वरीत जागा दोन्ही गट लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत विचारता डॉ. सावंत म्हणाले, ‘निवडणुका मार्च एप्रिलमध्ये होणार आहेत. प्रत्येकाने आपआपल्या पक्षाची मांडणी करीत आहे. जागा मागण्याची मागणी करीत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाची कोअर कमिटी तसेच भाजपा आणि अजित पवार गटाचे नेते एकत्र बसतील. त्यावेळी सर्वांना समाधान होईल तो निर्णय घेतील.

भाजपाने किती जागा घेतल्या ते मान्य आहे की नाही हा आता त्याच मुद्दा काहीच नाही. सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे. अद्याप काहीही ठरलेले नाही.’
‘संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयांमधून मोफत उपचार सुरू झाले आहेत. त्या ठिकाणी बाह्यरुग्ण (ओपीडी)आणि आंतररुग्ण विभागाच्या (आयपीडी) रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, औषधांची मागणी अधिक वाढली आहे. तो औषधांचा महिन्याचा साठा आठ दिवसांत संपायला लागला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा पातळीवर औषधे खरेदी करण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर औषध खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारी रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे असे नाही,’ असे सांगत राज्यात औषधांचा तुटवडा असल्याचे वृत्त आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी फेटाळून लावले.