नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईन अन्यथा नाही – गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने चर्चा

जळगाव, २७ नोव्हेंबर २०२३ : माझ्या नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईन अन्यथा येणार नाही असं म्हणत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातल्या धरणगाव या ठिकाणी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपण सर्वांना चारी मुंड्या चित करून पुन्हा भगवा घेऊन येऊ मात्र नशिबात नसेल तर येणार नाही.असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ज्याची चर्चा आता रंगली आहे.

आम्ही मतांसाठी काम करत नाही

वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण कार्य करत आहोत मात्र मतांसाठी आपण हे कार्य करत असल्याची टीका होते. मी मतं मिळावीत म्हणून कुठलंही काम करत नाही. धर्मासाठी हे काम करतो आहे. आपण समाजाचं देणं लागतो म्हणून आपण ते करत आहोत. त्यामुळे नशिबात असेल तर मी निवडणुकीत पुन्हा निवडून येईल नसेल तर येणार नाही मात्र हे जे कार्य मी करत आहे ते मरेपर्यंत असेच करत राहणार, अस स्पष्ट मत व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या विरोधकांना उत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटील हे शिंदे गटातले आक्रमक शैलीचे नेते मानले जातात. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जळगावात रंगली आहे.
आम्ही जे काम करत असतो ते विरोधकांना करता येत नाही. त्यामुळे टीका करण्याशिवय ते काहीही करत नाहीत. किर्तन काय हे त्यांना माहित नाही त्यामुळे ते टीका करत आहेत. त्यांना टीका करु द्या. आम्ही किर्तनाचं साहित्य वाटलं, आज ६० गावांना भजनी मंडळाचं साहित्य वाटलं आहे. आम्ही आमचं काम करत राहू असंही गुलाबराव पाटील म्हणाले. लोकांना सकाळी काय झालं ते संध्याकाळी आठवत नाही. लोक काहीही प्रचार करतात त्याला काही अर्थ नाही. इथे जे लोक आलेत त्यांनी हवं त्या पक्षाला मत द्या मात्र किर्तनाचं साहित्य घेऊन जा असंही आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं.

ज्यांनी हिंदुत्व टिकवलं ज्यांनी हा संप्रदाय टिकवला, असं कीर्तनकार, संप्रदायाचे लोक आजही भाड्याच्या घरात राहतात, ही आपल्या राज्याची स्थिती असून त्या अत्यंत चुकीची बाब आहे असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारला घरचा आहे दिला. मात्र राज्यात काय होईल हे माहीत नाही, पण जळगाव जिल्ह्यात आमचा संप्रदाय सगळ्या बाबतीत मजबूत राहील, असा आश्वासने यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.