आडनावाला पाटील लावायचं आणि मागास म्हणायचं – सुषमा अंधारे यांचा मनोज जरांगे पाटील यांना टोला
पुणे, २४ नोव्हेंबर २०२३: आडनावाला पाटील लावायचं आणि अर्थिक मागास म्हणायचं, या शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना सुनावलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभर दौरा करीत जाहीर सभा घेत आहेत. सभेदरम्यान, मनोज जरांगेंचं जेसीबीने फुलांची उधळण केली जात आहे. जरांगे पाटलांच्या थाटावर बोट ठेवत सुषमा अंधारेंनी थेट भाष्य केलंय.
सुषमा अंधारे म्हणाल्या, एकीकडे मागास सांगायचं आणि जरांगे आडनावाबरोबर पाटील लावायचं. आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे १०० सीबीने फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं, पण सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मराठा आरक्षणावरुन ओबीसी नेत्यांमध्ये चांगलीच धुमश्चचक्री होत असल्याचं पाहायला मिळतंय. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मराठा बांधवांनी लावून धरली आहे. या मागणी ओबीसी नेत्यांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आला आहे. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली आहे. मराठा आरक्षण सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जालन्यात जाहीर सभा घेतली आहे. या सभेतून भुजबळांनी सडकून टीका केलीयं.
सध्या मनोज जरांगे पाटील जाहीर सभेतून छगन भुजबळांवर टीका करत आहेत. जरांगे पाटलांच्या या भूमिकेवरुनही अंधारे यांनी सुनावलं आहे. मनोज जरांगे पाटलांची भूमिका पाहुन त्यांचं आरक्षणावरील लक्ष्य विचलित होत असल्याचं दिसतंय. जरांगे पाटलांनी व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणं शोभत नसल्याचंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
केंद्राने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा :
मराठा आरक्षणावरुन दोन समुदाय एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मराठा आरक्षण सरकारला द्यायचं असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता दिलं पाहिजे, या मुद्द्यावरुन केंद्र सरकारचं मार्ग काढू शकणार आहे. त्यामुळे आता विधीमंडळाने एक ठराव पास करुन केंद्र सरकारला पाठवला हवा. केंद्र सरकारने विशेष अधिवेशना बोलवून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचीही मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.