सुषमा अंधारे म्हणाल्या शिंदे गटाने मला ही दिली होती ‘ऑफर’

मुंबई, 13 ऑक्टोबर 2022: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देणं जवळपास निश्चित झालं आहे. यासाठी ठाकरे गटाकडून प्रचारालाही सुरुवात झाली आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना ऋतुजा लटके यांना शिंदे गटात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा खुलासा केला आहे. शिंदे गट सगळ्यांनाच आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करतो. ठाकरे गटात प्रवेश करण्याआधी शिंदे गटातील काही लोक मलाही संपर्क करत होती, असा खुलासा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

त्यामुळे ऋतुजा लटके यांना आपल्या गटात घेण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न करणं फार स्वाभाविक आहे. साम-दाम-दंड-भेद यासारख्या सगळ्या नीति सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांकडून राबवल्या जात आहेत. कुटील आणि जटील नीतिचं राजकारण केलं जात आहे. पण आम्ही निष्ठावंत मावळ्यांना सोबत घेऊन संविधानिक लढाई लढत राहू, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

ऋतुजा लटके यांना आधीच उमेदवारी द्यायची होती, तर शिंदे गटाने भाजपाचा उमेदवार मुरजी पटेल यांच्या नावाची घोषणा का करू दिली? याबाबत आशिष शेलारांनीही ट्वीटही केलं आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल असतील, असं शेलारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ऋतुजा लटके तुम्हाला उमेदवार हव्या होत्या तर तुम्ही तेव्हाच त्याबद्दल का बोलला नाहीत? मला वाटतंय की एकनाथ शिंदे यांचे सर्व सहकारी प्रचंड गोंधळलेले आहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी यावेळी केली आहे.