‘हात जोडतो फ्लेक्सबाजी थांबवा’
पुणे, ७ ऑक्टोबर २०२२: शहरातील चौकाचौकात रस्त्या रस्त्याने अनधिकृत फ्लेक्स लावून राजकीय कार्यकर्त्यांनी शहराचे विद्रुपीकरण सुरू ठेवले आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सर्वजण शहर स्वच्छ ठेवा असे आवाहन करत असली तरी भाजपचे कार्यकर्ते मात्र काही ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे भाजपवर टीकेची झोड उठलेली असताना आता स्वतः चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांपुढे हात जोडले. सत्काराच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, “शहरात तुम्ही माझे अनधिकृत फ्लेक्स लावता त्यामुळे लोक नाराज होतात. यापुढे शहरात माझे अनधिकृत सेक्स लावू नका आणि फटाके फोडून कचरा केला तर कार्यक्रमाच्या ठिकाणाहून आहे तसा परत जाईन असा दम कार्यकर्त्यांना भरला.
शहर भाजप तर्फे पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याने चंद्रकांत पाटील यांचा टिळक स्मारक मंदिर येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. चंद्रकांत पाटील यांचे कार्यक्रम स्थळी स्वागत होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी माळ लावली तसेच हवेत कागद उडवणारी मशीन सुद्धा चालू केले. त्यामुळे टिळक स्मारक मंदिराच्या परिसरात मोठा कचरा झाला होता. दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसापासून शहरात अनेक ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचे फ्लेक्स लागले आहेत. यातील सर्व फ्लेक्स महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत झाल्यावर लावल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे त्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. हाच धागा पकडून पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये मुद्दा मांडला.
पाटील म्हणाले, “मला पुढच्या काळात स्वच्छ पुणे सुंदर पुणे करायचे आहे
पण तुम्ही माझे अनधिकृत फ्लेक्स लावता हे आधी बंद करा. यामुळे शहर घाण दिसते, वृत्तपत्रामधून वारंवार छापून येत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी फटाके फोडता, हवेमध्ये कागद सोडतात पण हा नंतर कचरा उचलता येतो का बघा. आपल्याला मोदीजी स्वच्छतेचा संदेश देत असताना असा कचरा करणे योग्य नाही. यापुढे कार्यक्रमाच्या ठिकाणी फटाके फोडल्यास गाडीत बसून परत निघून जाईन. तुम्हाला फ्लेक्स लावायचेच असल्यास पैसे भरून अधिकृत फ्लेक्स लावा. दहाच्या बदल्यात दोनच फ्लेक्स लावा पण अनधिकृत फ्लेक्स लावू नका असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता तरी भाजपचे कार्यकर्ते सुधारणार का याकडे लक्ष लागलेली आहे.
नेमके काय म्हणाले, चंद्रकांत पाटील
“फ्लेक्सबाजीवरून दादांनी जोडले हात
माझी हात जोडून विनंती की माझे अनधिकृत फ्लेक्स लावून नका. माझ्या कार्यक्रमाला फटाके वाजवले तर मी तेथून परत जाईन. मोदीजींचे तुम्ही भक्त आहात, कशाला कचरा करता. वृत्तपत्रातून वारंवार अनधिकृत फ्लेक्सबद्दल छापून येत आहे. खिशाची ताकद असेल तर अधिकृत फ्लेक्स लावा. मला स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, समाधानी पुणे आणि सुरक्षीत पुणे करायचे आहे, असे माझा संकल्प आहे.”