सितारमण यांचा आमदारांच्या घरी मुक्काम

पुणे, २२ सप्टेंबर २०२२: बारामती लोकसभा मतदारसंघावर कब्जा करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्या तीन दिवसीय दौर्याची आजपासून सुरवात होत आहे. भाजपसाठी सर्वाधिक लाभदायक ठरणार्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या दौर्याचा प्रारंभ होत असताना त्यांनी खडवासल्याचे भाजपा आमदार भीमराव तापकीर यांच्या धनकवडीतील घरी मुक्काम केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाॅटेलमध्ये मुक्काम करू नये असे आदेश दिल्याने सितारमण आता तीन दिवस कार्यकर्त्यांच्या घरी मुक्कामी असणार आहेत.

सितारमण यांचे बुधवारी पुण्यात स्वागत झाल्यानंतर शहर भाजपाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर त्या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्या पुण्यातील धनकवडी येथील आमदार
तापकीर यांच्या घरी पोचल्या.यावेळी
तापकीर यांच्या घरातील महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.

आमदार भीमराव तापकीर व पुतण्या अभिषेक तापकीर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दारात रांगोळी व घरात ठीक ठिकाणी फुलांची सजावट केली होती. गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या केल्या होत्या. घरच्या परिसरात मांडव उभारला होता. आमदार तापकीर यांनी कुटुंबातील ४० हुन अधिक जणांची ओळख करून घेतली. एकत्रित कुटुंब पाहून त्यांनी स्वतः कुटुंबासमवेत फोटो काढले. देशाच्या अर्थमंत्री मुक्कामाला येणार असल्याने तापकीर परिवाराने जय्यत तयारी केली होती.
तसेच आमदार तापकीर यांचा मुलगा रोहित याचा बुधवारी वाढदिवस होता, तो सितारमण यांच्या उपस्थितीत रोहितचा वाढदिवस साजरा केला.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम शिंदे, शहर प्रमुख जगदीश मुळीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जेवणात ना कांदा ना लसून
अर्थमंत्री सीतारामन या शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांच्या आहारात कांदा लसूण नसतो. त्यामुळे रात्री दही भात, चपाती व भेंडीची भाजी, बटाट्याची रस्सा भाजी असा आहार त्यांनी घेतला. त्यानंतर, सोलकढी घेतली. तापकीर यांच्या घरातील सर्व सुनांनी जेवणाची तयारी केली होती.