संजय राऊत यांना धक्का; राहुल कुल यांना क्लीनचीट
मुंबई, २८ जुलै २०२३ : भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांना भीमापाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात क्लीन चीट मिळाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर राज्य सरकारने कुल यांना क्लीन चीट दिली आहे. संजय राऊत यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
कुल म्हणाले की, “माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी तीन तासांमध्ये यावर माझी प्रतिक्रिया दिली होती. हे राजकीय आरोप आहेत. त्यांना ग्राऊड रिअॅलिटी माहित नाही. अशा चौकशा वारंवार यापूर्वीही झालेल्या आहेत. त्यामध्ये तथ्य नसल्यामुळे काहीही निघालेलं नाही. याऊलट माझ्यावर आरोप झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात ६ ते ७ हजार शेतकऱ्यांनी राऊतांच्या विरोधात मोर्चा काढला होता. तसेच राऊत येऊन गेल्यानंतर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत आमचा विजय झाला. त्यामुळे जनभावना काय आहे हे त्यांनी समजून घ्यावे
तसेच मला हक्कभंग समितीचं प्रमुख नेमलं गेलं त्यानंतर हे आरोप माझ्यावर लावण्यात आले. माझ्या मतदारसंघातील काही अर्धवट ज्ञान असणारे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत आले. त्यांनी ही बाब तपासून घ्यायला पाहिजे होती. अर्धवट माहितीच्या आधारवर आरोप केल्याने असेच निकाल येणार. संजय राऊत हे नेहमीच उघडे पडतात त्यात नवीन काय, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला.
दरम्यान, भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणानंतर संजय राऊत यांनी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील लिहिले होते. तसेच या संबंधीचे कागदपत्र ईडीकडे पाठवल्याचे देखील राऊत यांनी सांगितले होते. मात्र, या प्रकरणांमध्ये आता राहुल कुल यांना राज्य सरकारने क्लीन चीट दिली आहे.