निवडणूक आयोगाने दिलेली ढाल तलवार शिंदे गटाला आवडली
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२२: निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाला ढाल-तलवार हे पक्षचिन्ह दिलं आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटात मशाल विरुद्ध ढाल-तलवार अशी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. आयोगाने ढाल-तलवार हे पक्षचिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच तलवार जनतेचं रक्षण करण्यासाठी, तर तलावर अंगावर येणाऱ्या शत्रूसाठी असल्याचं म्हटलं. ते मंगळवारी (११ ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलत होते.
भरत गोगावले म्हणाले, “हे अगदी परफेक्ट पक्षचिन्ह आहे. मराठी माणसाला दुसरं काय पाहिजे. आता आमची ढाल तलवार कशी चमकते ते बघा. ढालीने जनतेचं रक्षण करायचं आणि शत्रू अंगावर आला तर तलावर समोर धरायची. शिवाजी महाराजांच्या काळापासून ढाल तलवार आहे.”
शंभुराजे देसाई म्हणाले, “आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यापैकी आम्हाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळालं आहे. आम्ही याचं स्वागत करतो. या ढाल तलवारीचा वापर हिंदवी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. ती ढाल तलवार अन्याय अत्याचार करणाऱ्यांविरोधात वापरली. ते प्रतिक आम्हाला मिळालं याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे.”
संदीपान भुमरे काय म्हणाले?
संदीपान भुमरे म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर समाधानी आहोत. त्यामुळे आता आम्ही ढाल तलवार घेऊन जनतेसमोर जाऊ.”