शरद पवार उत्तम कृषीमंत्री मोदीच म्हणाले होते, आता त्यांनी खोटे बोलू नये – संजय राऊतांची टीका
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल यवतमाळ दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या याच टिकेवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना उत्तर दिले आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, प्रधानमंत्री खोटं बोलतात त्यांनी खोटं बोलू नये. बोलताना त्यांनी आधीचे वक्तव्य आठवले पाहिजे. शरद पवार हे उत्तम कृषी मंत्री होते असं त्यांचं वक्तव्य होतं. शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो. शरद पवार हे माझे राजकीय गुरू आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
महाराष्ट्रातील किंवा देशातील सगळ्यांत मोठा घोटाळा कोणता असेल? तर तो आदर्श स्कॅम असं मोदी म्हणाले होते. सिंचन घोटाळा करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असं मोदी म्हणाले होते. मात्र, त्यांनी अजित पवारांना आपल्याच पक्षात घेतलं आणि उपमुख्यमंत्री केलं. सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात झाल्या आहेत. ज्या ठिकाणी मोदींनी सभा घेतली त्या ठिकाणी जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. कालच्या सभेत मोदी जे काही बोलले ते खोटं आहे असे संजय राऊत म्हणाले.
गुजरात हे विकासाच्या मार्गावर पुढे आहे. गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असं नरेंद्र मोदी वारंवार सांगतात. अनेक प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले, तसंच त्यांनी ड्रग्जचा व्यापार ही गुजरातला नेला म्हणून गुजरातला हजारो कोटींच ड्रग्ज उतरतात. नाशिक, पुण्यात, मुंबईत ज्या प्रकारे ड्रग्जचा फैलाव झालेला आहे ते सर्व ड्रग्ज गुजरातच्या मार्गाने महाराष्ट्रात पोहोचत आहे. गुजरातचा उडता गुजरात झाला आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
जागावाटपाबाबत अंतिम चर्चा झाली
जागावाटपाबाबत अंतिम चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी, वंचित आघाडी महत्त्वाचा घटक आहे. ४८ जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत. वंचित आघाडीचे नेते काही बैठकींमध्ये हजर होते, कालच्या बैठकीत देखील हजर होते. काल त्यांच्याकडून एक प्रस्ताव आलेला आहे. २७ जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. आम्ही देखील केली आहे प्रत्येक पक्षाने केली आहे. यावर चर्चा करून काही निर्णय झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडी हा देशातील हुकूमशाही विरोधात प्रभावी पक्ष आहे. वंचित आघाडीची जी हुकूमशाही विरोधात भूमिका आहे, तीच महाविकास आघाडीची भूमिका आहे.