बलिदान दिनी वढू-तुळापूरला शंभूभक्तांची गर्दी, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई, 22 मार्च 2023: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३३४ वा स्मृतीदिन धर्माप्रति बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त वढू-तुळापूर येथे विविध कार्यक्रम पार पडले. पुणे जिल्ह्यातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिव-शंभू भक्तांनी समाधीस्थळी गर्दी केली. शासकीय महाभिषेक आणि विविध कार्यक्रमांद्वारे संभाजीराजे यांना अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्यासह प्रमुख अधिकारी, ग्रामस्थ, शिवप्रेमी यांनीही छत्रपतींच्या समधीचे दर्शन घेतले.

वढू ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका अंकुशराव शिंदे व उपसरंपच मारूती ओव्हाळ यांच्या हस्ते संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन जिल्हाधिकारी व एसपींचा सन्मान करण्यात आला. आमदार महेश लांडगे यांचाही सन्मान करण्यात आला. तर आमदार लांडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी व एसपींचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते.

मूक पदयात्रेच्या समारोप प्रसंगी भोसरी विधान सभेचे आमदार महेश लांडगे उपस्थित होते. दुपारी धर्मसभेला ‘सुदर्शन’ चॅनेलचे प्रमुख सुरेश चव्हाण तसेच आंतकवाद विरोधी पक्षाचे अखिल भारतीय प्रमुख मनिंदर सिंह गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही उपस्थित होते. ही सभा वढू ग्रामस्थ व धर्मवीर संभाजी महाराज कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मूक पदयात्रा करण्यात येते. तर सभेचे दुपारचे आयोजन धर्मवीर संभाजी महाराज कृती समितीच्या वतीने तसेच वढू ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
**
राज्यभरात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण…
वढू तुळापूर येथील छत्रपतींच्या समाधीस्थळी वढू ग्रामस्थांच्या वतीने पहाटे अभिषेक करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांची अंत्ययात्रा न झाल्यामुळे या ठिकाणी ५५ ते ६० गावांतील तरुणांनी मिळून संभाजी महाराजांचे स्मरण करत ‘मूक पदयात्रा’ काढण्यात आली. तालुका आणि तालुक्याबाहेरील विविध गावांतील युवकांनी या ठिकाणाहून ज्वाला प्रज्वलीत करून आपापल्या गावी घेऊन गेले. सायंकाळी आपापल्या गावी मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकारी व पोलिस महासंचालक यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे कीर्तन पार पडले. सर्व शंभूभक्तांच्या हस्ते समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.