संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत पुन्हा कोठडी

मुंबई, ४ आॅगस्ट २०२२: शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती.त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.

 

पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ईडीने या प्रकरणी मंगळवारी दोन ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. रोख रकमेच्या व्यवहारांबाबत पुरावे गोळा करण्यासाठी ही शोध मोहीम राबवली होती. लवकरच या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

‘ईडी’ने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता ‘एचडीआयएल’कडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे ११२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे दिसून आले होते. ही रक्कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली.

 

यातील एक कोटी सहा लाख ४४ हजार ३७५ रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना देण्यात आले. त्यातील ५५ लाख रुपये २००९-२०१० मध्ये कर्जाच्या (असुरक्षित) स्वरूपात वर्षां राऊत यांना मिळाले. त्यातून एक सदनिका खरेदी करण्यात आली.

 

याशिवाय प्रवीण राऊतचे व्यावसायिक संबंध असलेल्या प्रथमेश डेव्हलपर्स यांच्यामार्फत वर्षां राऊत आणि संजय राऊत यांना ३७ लाख ५० हजार रुपयांचा फायदा मिळाला. त्यासाठी वर्षां आणि संजय राऊत यांनी अनुक्रमे १२ लाख ४० हजार व १७ लाख १० रुपये गुंतवणूक केली होती.

 

 

प्रवीण राऊतचा मोहरा म्हणून वापर केल्याचा आरोप

अवनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतील केवळ पाच हजार ६२५ रुपयांच्या गुंतवणुकीवर वर्षां राऊत यांना १३ लाख ९४ हजार फायदा मिळाला अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात दिली. याशिवाय संजय राऊत हे या प्रकरणाच्या कटातही सहभागी असून प्रवीण राऊत याचा मोहरा म्हणून वापर करण्यात आला.

 

प्रवीण राऊत याने संजय राऊत यांच्याशी असलेली जवळीक दाखवून म्हाडाकडून परवानगी मिळवल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे. राऊत यांच्याकडे आलेल्या रकमेतून आठ करारांद्वारे १० भूखंड अलिबाग येथील किहिम येथे खरेदी करण्यात आले. हे करार स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांच्या नावावर आहेत. तसेच पत्राचाळ गैरव्यवहारातील रक्कम व्यवहारात आणण्यासाठी अवनी इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन करण्यात आल्याचा आरोप आहे.

 

 

संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख रुपये रोख दिल्याचा आरोप

याशिवाय संजय राऊत कुटुंबीयांच्या देश-विदेशातील दौऱ्याचा (प्रवासाचा) खर्च प्रवीण राऊतने केल्याचा आरोप आहे. प्रकल्पाच्या काळात प्रवीण राऊत याने संजय राऊत यांना दर महिन्याला दोन लाख रुपये रोख दिल्याचाही आरोप आहे.

 

याबाबत संजय राऊत यांचा १ जून, २०२२ मध्ये ईडीने जबाब नोंदवला होता. त्यावेळी राऊत यांनी प्रवीण राऊतच्या पत्राचाळ प्रकल्पातील सहभागाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. यावेळी राऊत यांना प्रवीण राऊतकडून आलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही ठोस उत्तर दिले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.