कर्जतच्या एमआयडीसीमध्ये निरव मोदींच्या जागेसाठी रोहित पवारांची फिल्डिंग – आमदार राम शिंदे यांचा गंभीर आरोप

नागपूर, १३ डिसेंबर २०२३: कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद इतक्यात कमी होईल असे वाटत नाही. राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरत थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे फिल्डिंग लावली. आणि रोहित पवार प्रयत्न करत असलेल्या एमआयडीसीचा प्रस्तावच रद्द करून टाकला. यासाठी त्यांनी नीरव मोदीच्या जमिनीचे कारण पुढे केले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही कर्जत एमआयडीसीसाठी जी जमीन प्रस्तावित होती त्यात नीरव मोदीची जमीन नाही. एमआयडीसीही तिथेच होणार असे स्पष्ट सांगितले होते. त्यावर आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत या वादाला आणखीच धार दिली आहे.

राम शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे म्हणाले, खरंतर मी मंत्री असतानाच कर्जत एमआयडीसीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. २०१९ला माझा पराभव झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली. पण, त्यांच्या मनात पाप आहे. नीरव मोदीची जागा या एमआयडीसीत घेण्यासाठी हा अट्टाहास आणि आटापिटा सुरू आहे, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.

शिंदे पुढे म्हणाले, ते नीरव मोदीसाठी लढतात तर मी कर्जत-जामखेडच्या युवकांसाठी लढत आहे. युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी मी लढतोय. आता उद्योग विभाग या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला आहे की मागील अधिवेशनात जी कागदपत्रं दिली गेली होती त्या कागदपत्रांच्या आधारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं की तुम्ही दिलेल्या कागदपत्रांत तथ्य आहे. सत्यता आहे. आम्हीही पडताळून पाहिलं आहे. त्यामुळे नीरव मोदीची जमीन एमआयडीसीसाठी आपल्याला घेता येणार नाही. तसेच तिथल्या स्थानिक आणि ग्रामपंचायतींनी ठरावही केली आहे की या एमआयडीसीला आमचा विरोध आहे. या दोन कारणांमुळे त्या जागेवरची एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय उद्योगमंत्र्यांनी घेतल्याचे शिंदे म्हणाले. पण त्याचवेळी कर्जत एमआयडीसीसाठी सरकारच्या सर्व नियम निकषांचे पालन करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उद्योगमंत्र्यांनी दिल्या आहेत.

राम शिंदे उद्योगमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता, असे पत्रकारांनी विचारल्यावर नीरव मोदी काय माझ्या घरचा माणूस आहे का? असा सवाल शिंदेंनी केला. नीरव मोदीच्या जमिनीत कुणाचा हिस्सा आहे हे सुद्धा जाहीर झालं पाहिजे. नीरव मोदीची जमीन घेऊन तुम्हाला त्याच ठिकाणी एमआयडीसी का करायची? याचं उत्तर आधी दिलं पाहिजे. युवकांसाठी एमआयडीसी करताय की नीरव मोदीसाठी करताय हा खरा प्रश्न आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप