पुणे: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी बालेवाडी येथे आयोजन

पुणे, दि. २७/०८/२०२३: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे सोमवार २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कार शासनाने जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमास क्रीडा प्रेमी, खेळाडू, विद्यार्थी, विविध खेळाचे जिल्हा व राज्य संघटना प्रतिनिधी, माजी क्रीडा पुरस्कारार्थी (राज्य व केंद्र शासनाचे), विविध खेळांच्या अॅकेडमीचे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संस्था, पत्रकार, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल आणि क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप