राष्ट्रवादीचे नेते म्हणतात पक्षात फूट नाही पण दुसरीकडे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात

अहमदनगर, २६ ऑगस्ट २०२३: एकीकडे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही असं वारंवार सांगितलं जात असताना स्थानिक पातळीवर मात्र राष्ट्रवादीचे दोन गट अनेक ठिकाणी दिसून येत आहे आणि आता या दोन्ही गटांमध्ये वाद देखील व्हायला सुरुवात झाली आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये लावलेल्या नामफलकावरून आता शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर स्वतंत्र पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी भवनामध्ये पदाधिकाऱ्यांच्या लावलेल्या फलकावरून वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद थेट कोतवाली पोलिसांपर्यंत पोहोचला आहे.

अधिक वाचा  टाटांना उद्योगात चोऱ्या करून नफा नकोय, पण त्यांना पुरस्कार देणारे मात्र…; सामनातून भाष्य

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या स्वतंत्र पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. त्यावर लावलेल्या नामफलकावरून वादाची ठिणगी पडली आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्या दालनावरील नामफलक हटवून शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा नामफलक लावण्यात आला आहे. त्यावरून ही वादाची ठिणगी पडली आहे.

माणिक विधाते यांच्या फिर्यादीवरून नावाचा फलक हटवल्याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. नामफलकाची तोडफोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार भाजप- शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. शरद पवार गटाकडून नगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर प्राध्यापक माणिक विधाते हे अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत.

दरम्यान अहमदनगरचे राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे आहे त्यामुळे शरद पवार यांच्या अधिपत्याखाली हे राष्ट्रवादी भवन येत असल्याने तेथील शहर जिल्हाध्यक्ष यांच्या दालनावरती आपण स्वतःचा नाम फलक लावला असल्याचं शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच आम्ही कोणतीही तोडफोड केली नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तोडफोड केल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याबाबत अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र हा वाद पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप