पुणे: खासदार गिरीश बापट यांची ऑडियो क्लीप व्हायरल

पुणे, २८ नोव्हेंबर २०२२: राजकीय पक्षांनी पातळी सोडून वर्तन सुरू केले आहे. असंसदीय शब्द वापरणे, महिलांबद्दल अपशब्द वापरणे, लोकप्रतिनिधींच्या घर, पक्ष कार्यालयावर मोर्चा नेणे असे कामं करत आहेत. पण ही आपली संस्कृती नाही, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नीट वागावे अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी राजकीय पक्षांना सुनावलं.

बापट यांची ही ऑडियो क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

राजकीय पक्षांनी पातळी सोडून वर्तन सुरू केले आहे. पुणेही त्याला अपवाद नाही. ज्या पुण्याने महाराष्ट्र व देशाला एक सांस्कृतिक नेतृत्व दिले, राजकीय नेतृत्व दिले. त्या पुण्यात असे घडणे याबाबत सर्वच पक्षांनी व त्यांच्या नेतृत्वाने पुर्नविचार केला पाहिजे. मुद्दयाला विरोध करणे, खोडून काढणे, त्यावर मत मांडणे व लोकशाहीच्या चौकटीत जे बसते ते मांडण्यास माझी हरकत नाही. शेवटी लढाई ही रस्त्यावरची नसून विचारांची आहे. याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे अशा शब्दांत पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी भाजपसह सर्वच पक्षाचे कान टोचले आहे आणि महत्वाचा सल्ला देखील दिला.

खासदार गिरीश बापट यांनी सध्याच्या खालावलेल्या राजकारणावर भाष्य केले. बापट म्हणाले, पुण्यातील सामान्य माणूस ज्यांचं राजकारणाशी काही देणंघेणं नाही ती मंडळी सद्य:स्थितीत मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ आहेत. पुढे मतदान करावी की नको या मनस्थितीत काही लोक पोहचले आहेत. सब घोडे बारा टक्के असे सगळेच वागू लागले तर सामान्यांनी कुणाकडे बघायचे.

सध्या पुण्यात मनपा शासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. अनेक विकासाचे मुद्दे पडून आहेत. त्याचा पाठपुरावा करणे हे राजकीय पक्षांचे व स्वत:ला लोकप्रतिनिधी समजणाऱ्यांचे कर्तव्य आहे. महापालिका बरखास्त झाली नव्हती. तोपर्यंत अनेक माननीय ज्यांना विकासाच्या कामाची चिंता आहे असे नागरीक, संस्था व पुढील निवडणुकीतील हौसे-गौसे नवसे श्रेय घ्यायला पुढे असायचे गेले. ते सहा-सात महिने झाले मी पाहतो आहे की, बॅनर्स लावणे. त्यास जोडे मारणे, पुतळे जाळणे, असंसदीय शब्द वापरणे, महिलांबद्दल अपशब्द वापरणे, लोकप्रतिनिधींच्या घर, पक्ष कार्यालयावर मोर्चा नेणे असे कामं करत आहेत. पण ही आपली संस्कृती नाही अशा शब्दांत गिरीश बापट यांनी राजकीय पक्षांना सुनावलं.

पुण्यातील जायका प्रकल्प, खड्डे, भटके कुत्रे यांसारख्या विविध समस्यांचे काय झाले. मात्र, या कामात सारेच मागे दिसतात. कारण तिथे नाव व बोर्ड लागणार नाही. मग अशा प्रश्नांवर निवडणुका आल्यानवर बघू असे म्हणणारे अनेक महाभाग भेटतात. मात्र, मनपाच्या माध्यमातून स्थळ पाहणी, अधिकाऱ्यांना भेटणे, निधींची तरतूद करून ठेवणे हे सर्वच पक्षांकडून अपेक्षित आहे.

आपला पक्ष, संघटनेचे काम करताना भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य आहे. उपोषणाला बसता येते. विविध मार्गांनी कामे मार्गी लावता येतात. त्याकडे कल सध्या कमी दिसतो. प्रत्येकाने हे कृतीत आणले तर पुण्याचा विकास नक्की होईल अशी भूमिका देखील बापट यांनी यावेळी मांडली.

राजकारण हे निवडणुकीपुरते असून विकास कामांसाठी,सामान्यांच्या हितासाठी, गोरगरीब दीनदलितांना मदत करण्यासाठी हा राजकारणाचा हेतूच नष्ट होत चालला की काय अशी भीती वाटते. पक्षांचे फोटो बघतो, ठराविक उत्साही मंडळी अर्वाच्च घोषणा देताना पाहायला मिळतात. आंदोलन कुठलेही असो व्यक्ती त्याच असतात. याचा अर्थ ज्यांना पुढारपणे करावयाचे आहे ते पुढे-पुढे करतात. कारण तो संघटित नाही, त्याला कुणी विचारत नाही, म्हणून माझ्या मनात हा मुद्दा आला की, पक्षापलीकडे जाऊन पुणेकरांकरिता हा विचार आहे. सार्यांनी अंतर्मूख होऊन याचा विचार केला पाहिजे असं वाटतं. माझा कुणावरही राग नाही. मात्र पुणेकरांवर माझं प्रेमच आहे असेही बापट यावेळी म्हणाले.