पुणे: कसबा निवडणूकीनंतर बापट,धंगेकर, रासने प्रथमच एकाच व्यापीठावर

पुणे, २२/०३/२०२३: कसबा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला होता. मात्र नुकतेच या निवडणूकीतील तीन विरोधक नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा पुण्याच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधी मधून श्री कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक प्रशांत यादव यांच्या हस्ते हे लोकार्पण झाले. यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर,माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विवेक खटावकर, गौरव बापट माजी विरोधी पक्ष नेते सुहास कुलकर्णी,माजी नगरसेवक योगेश समेळ आदी उपस्थित होते. सुमारे २५ लाख रुपयांचा निधी खर्च करून श्री कसबा गणपती मंदिर परिसरात हे भित्तिचित्र प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी साकारले आहे.

यावेळी बोलताना प्रशांत यादव यांनी कसब्याच्या राजकीय संस्कृतीचे कौतुक केले ते म्हणाले की निवडणुकीत एकमेकांच्या विरुध्द उभे असलेले दोन सहकारी एकाच व्यासपीठावर येतात हेच संस्कार पुण्याची तशीच कसब्याची राजकीय संस्कृतीची ओळख आहे खासदार गिरीश बापट यांनी या परिसराचा विकास करण्यासाठी अनेक भरीव योजना कार्यान्वित केल्या त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे शिल्प आहे
धंगेकर म्हणाले की,” खासदार बापट यांनी त्यांच्या निधी मधून कसबा गणपतीच्या सुशोभिकरणासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानतो.”

रासने म्हणाले की ,”आता निवडणुका संपल्या त्यामुळे आता विकासाची कामे ही एकमेकांच्या सहकार्याने करून या परिसराचा विकास कसा होईल यावर एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.” कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुहास कुलकर्णी यांनी केले. मंदिराचे विश्वस्त विनायक ठाकर यांनीआभार मानले, तर योगेश समेळ यांनी सूत्रसंचालन केले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप