पंतप्रधान नरेंद्र मोदी लढणार पुण्यातून लोकसभा ?

पुणे, १ सप्टेंबर २०२३ : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यानंतर आता पुणे लोकसभा मतदारसंघातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून भाजप नेत्यांनी मात्र याबाबत चुप्पी साधलेली आहे.

महाराष्ट्र मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून त्यापैकी ४३ जागांवर भाजप आणि शिवसेना युतीचे खासदार आहेत. शिवसेनेमध्ये बंड झाल्याने त्यातील निम्मे खासदार हे ठाकरे गटाकडे आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात गेल्या दोन महिन्यात आलेल्या विविध सर्वेक्षणामध्ये भाजपला मोठा फटका बसत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ४८ पैकी केवळ २० जागा भाजपाने महायुतीच्या पारड्यात पडतील असा दावा या सर्व्हे मध्ये करण्यात आले आहे. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये फूट पाडून राज्यामध्ये सत्ता मिळवली आहे. पण जनमानसामध्ये त्याची नकारात्मक प्रतिक्रिया निर्माण झाल्याने त्याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसेल असे बोलले जात आहे.

महाराष्ट्र मधील भाजप युगातील हे वातावरण बदलण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांचे वारंवार पुणे दौरे होत आहेत. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीसाठी अमित शहा हे तीन दिवस पुण्यामध्ये मुक्काम ठोकणार आहेत. तर सप्टेंबरच्या अखेरीस पंतप्रधान मोदी विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. त्यानंतर देखील इतर कार्यक्रम होतील असेही सांगितले जात आहे. एकंदरीतच मोदी आणि शहा यांचे पुणे दौरे वाढत असताना पुण्याच्या लोकसभा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू आहे.

पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापट यांचे कुटुंबीय लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सुनील देवधर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर यांनी त्यांची नावे देखील उमेदवार म्हणून चर्चेत आलेली आहेत. असे असताना आता अचानक पणे नरेंद्र मोदी हे पुण्यातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविल्यास पुण्याची जागा ती सहज जिंतीलाच. पण त्याचा परिणाम बारामती, शिरूर, सातारा, कोल्हापूर, रायगड, मावळ, यासह मराठवाडा आणि मुंबईतील ही लोकसभा मतदारसंघांवर होऊ शकतो. तेथील जवळपास २० ते २५ जागा भाजप सहजपणे जिंकू शकतो असा दावा केला जात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना उत्तर प्रदेशातील वाराणसीसह पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उतरवले जाऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे. या संदर्भात भाजपने नेत्यांनी मात्र अद्याप कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही.