राज्यात राजकीय भुकंप , अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली

नांदेड, १२ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात येतील.

फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या…”

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला आहे. तसं पत्र त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलं आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं एक पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. याचाच अर्थ चव्हाण यांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्यापाठोपाठ त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नाना पटोल यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिलं आहे की, महोदय, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे.

त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली. चव्हाण यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.” तसेच चव्हाण यांनी समाजमाध्यमांवरील त्यांच्याबाबतची माहिती अपडेट केली आहे. वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर असलेल्या त्यांच्या प्रोफाईलवरील काँग्रेससंबंधीची सर्व माहिती हटवण्यात आली आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण काही वेळाने पत्रकार परिषद घेतील आणि त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करतील, असा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे. चव्हाण भाजपात जाणार की इतर कुठल्या पक्षाशी घरोबा करणार या प्रश्नाचं उत्तर या पत्रकार परिषदेत मिळू शकतं.