राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढणार, पुणे पोलिसांकडील क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला
पुणे, दि. २१/१२/२०२२: राज्यभरात विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे बेकायदा फोन टॅप केल्याप्रकरणी पुणे पोलिस दलाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करून चौकशी करण्यात येत होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर शुक्लावरील फोन टॅपिंगचे आरोप मागे घेण्यात आले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून सादर केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याशिवाय न्यायालयाचा दिलेला निर्णय शिंदे -फडणवीस सरकारला धक्का मानला जात आहे.
राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी असताना रश्मी शुक्ला यांनी राज्यातील विविध राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा समावेश होता. संबंधित प्रकरण राज्यभरात गाजले होते.
याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फेब्रुवारी महिन्यात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता. मात्र, राज्यात सत्तात्तंर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने शुक्ला यांच्याविरूद्ध सुरू असलेली चौकशी थांबविली होती. प्रकरण बंद करण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो रिपोर्ट बुधवारी फेटाळून लावला आहे.
दरम्यान, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये सेवेत आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट घेतली होती.
त्यानंतरच पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी थांबविण्यासाठी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.