विरोधकांनी पसरवली बारामतीत सुनेत्रा पवार ऐवजी जानकर लढण्याची अफवा – सुनील तटकरे

पुणे, २६ मार्च २०२४ : “आमच्यावर प्रेम करणारी विरोधी गटाच्या मंडळीना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची भीती वाटत आहे. त्यामुळे या गटानेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत महादेव जानकर यांच्या बातम्या पेरल्या आहेत” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुण्यात बोट क्लब येथे आमदार खासदार यांची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“जानकर महायुती सहभागी झाले आहेत, त्यांच्या जागेबाबत अजून निर्णय अजून झाला नाही. जानकर यांना कुठला लोकसभा मतदारसंघ द्यायचा, याची घोषणा दोन दिवसात होईल.” असे तटकरे यांनी सांगितले. तटकरे म्हणाले, “निवडणुकीसाठी पक्षाचे निरीक्षक त्या त्या ठिकाणी नेमले जाणार आहेत. ही बैठक निवडणूक तयारी बाबत चर्चा करण्यासाठी होत आहे.”

राजकारणात सर्व शक्य

आढळराव पाटील यांचा आज पक्ष प्रवेश होईल, त्यांना उमेदवारी पण लवकरच जाहीर होईल,आढळराव पाटील सक्षम उमेदवार आहेत. छगन भुजबळ हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेक निवडणुका लढल्या आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अशावेळी सहकाऱ्यांशी ते चर्चा करीत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. साताऱ्याच्या जागेबाबत चर्चा सुरू आहे. जागा वाटप अदलाबदली बाबत चर्चा सुरू आहे. राजकाणात सर्व शक्यता असू शकतात, असे ही तटकरे यांनी सांगितले.