विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ”; संजय राऊतांवर हक्कभंग येणार ?

कोल्हापुर, १ मार्च २०२३ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर टीका करताना विधिमंडळातील हा शिंदे गट विधिमंडळ नाही तर ते चोरमंडळ आहे अशी टीका केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र आता यावरून सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात हक्क भंग आणण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिंदे-भाजपा सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीकास्र सोडलं.

“आयएनएस विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. हे पैसे कुठं गेले याचा शेवटपर्यंत शोध लागला नाही. या प्रकरणाचा तपास याच तपासयंत्रणांकडून सुरू होता. मात्र, सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. अशाप्रक्रारे या सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच यासंदर्भात मी स्वत: न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. याबरोबच राज्यात सध्या विधिमंडळ नसून ४० जणांचं चोरमंडळ आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

“जे लोकं सरकार विरोधात बोलतात, त्यांना तुरुंगात टाकायचं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यांची बदनामी करायची, एवढेच उद्योग सध्या सुरू आहे. पण आताच्या सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, की २०२४ मध्ये सगळ्यांचा हिशोब केला जाईल”, अशा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला.

पुढे बोलताना त्यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालावरही भाष्य केलं. “कसब्याची जागा मुळात आमच्याकडे नव्हतीच. ती जागा ३०-३५ वर्ष भाजपाकडे होती. मात्र, यंदा ती भाजपाकडून जाते आहे. पिंपरीची जागा कोण जिंकेल, सांगता येत नाही. पण हा सुद्धा एकप्रकारे भाजपाचा पराभव आहे, असे ते म्हणाले. तसेच कसबा आणि पिंपरीतल्या निवडणुका आपण हरतो आहे, हे लक्षात आल्यानंतर तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी पोलिसी यंत्रणेचा गैरवापर सुरू केला”, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, काल बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने रस्त्यावर अडवले होते. यासंदर्भातही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना जाब विचारला, की तुम्ही ठाकरेंशी गद्दारी करत चोर-डाकूंबरोबर का गेलात. तोच विचार महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी आम्ही शिवगर्जना यात्रा सुरू केली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप