राष्ट्रवादीच्या आमदारांची दिवसातून तीनवेळा हजेरी – अजित पवार हेडमास्तरच्या भूमिकेत

मुंबई, १ मार्च २०२३: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अधिवेशनातील हजेरीवर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे जातीने लक्ष घालत आहेत.

दिवसातून तीन वेळा पक्षाच्या हजेरीपटावर आमदारांना सही करावी लागते. हा हजेरीपट विधानभवनात सदस्यांची हजेरी वाढवण्याकरता केलेला आहे, असे पक्षातील एका आमदाराने सांगितले. मात्र, या माध्यमातून पक्षातील आमदारांवर अजित पवार यांची बारीक नजर असल्याचे दिसून येत आहे.

अधिवेशनामध्ये आपल्या पक्षाच्या आमदारांची सख्या वाढण्यासाठी हजेरीपटावर आमदारांना सही करावी लागत असल्यामुळे अजित पवार हे हेडमास्तरच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सोमवारपासून (दि.27 फेब्रुवारी ) सुरू झाले आहे. मात्र, अनेक वेळा अधिवेशनाला आमदार आणि मंत्री गैरहजर राहतात. किंवा सकाळच्या सत्रात येतात आणि दुपारी निघून जातात.

त्यामुळे संपूर्ण अधिवेशनात काही ठरावीक आमदार आणि मंत्रीच पूर्णवेळ बसतात. त्यामुळे असे होऊ नये यामुळे पवार यांनी दिवसातून तीन वेळा हजेरीपटावर सही करून जास्तीत-जास्त आमदारांनी अधिवेशनास पूर्णवेळ हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

पक्षाच्या आमदारांना सकाळी ११ वाजता त्यानंतर दुपारच्या सत्रात २ वाजता आणि अधिवेशन संपल्यावर एकदा असे सही करण्याचे वेळापत्रक आहे. दिवसभर आमदारांनी उपस्थित राहिले पाहिजे, यासाठी अजित पवार यांचा अट्टाहास आहे.

खास त्यांनी हजेरीपट घेण्यासाठी वेगळा माणूस ठेवला आहे. आजच्या अधिवेशनाच्या कामकाजात अजित पवार हे सकाळपासून अधिवेशन संपेपर्यंत पूर्णवेळ हजर होते. आज बरेच आमदार व मंत्री यांची अनुपस्थिती होती.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप