“त्या’ सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा” – देवेंद्र फडणवीसांचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला

वर्धा, २ ऑक्टोबर २०२३: पक्षातील, ज्या ज्या लोकांना त्यांचे जे जे भावी मुख्यमंत्री वाटतात त्यांना माझ्या शुभेच्छा, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षातील भावी मुख्यमंत्री म्हटल्या जाणाऱ्या नेत्यांना लगावला. आज (२ ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंतीनिमित्त ते वर्धा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याबद्दल, ओबीसी जागर यात्रा आणि दिल्लीतील बैठकीविषयी भाष्य केलं.

फडणवीस म्हणाले, आजपासून आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी जागर यात्रेची सुरुवात करत आहेत. त्याचा समारोप मी करणार आहे. ओबीसी समाजाकरता राज्य सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्या योजनांचा खरा लाभ हा ओबीसी समाजाला मिळाला पाहिजे अशी ही जनजागृतीची योजना आहे.

आशिष देशमुख यांच्या नेतृत्वातील यात्रा निघणार आहे, राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ती जाणार आहे. त्या ठिकाणचे आमचे लोकप्रतिनिधी असतील. तिथले सगळे नागरिक असतील यांच्या समावेत या ओबीसी योजनांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जाणून जागृती करण्यात येणार आहे. आज जर ओबीसी समाजाकरीता इतक्या योजाना महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने सुरु केल्या आहेत, या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत, त्याचा लाभ त्यांना झाला पाहिजे.

भावी मुख्यमंत्री म्हणून मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत आहेत, याबाबत त्यांना विचारले असता “ज्या पक्षातील, ज्या ज्या लोकांना त्यांचे जे जे भावी मुख्यमंत्री वाटतात त्यांना माझ्या शुभेच्छा, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला. मागील काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स आणि बॅनर्स लागले आहेत. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार अशा नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले आहेत.