मुस्लिम महिलांचे मतदान भाजपलाच – शायना एन. सी.

पुणे, २ मे २०२४: मोदी सरकारच्या १० वर्षाच्या काळात महिलांचा सन्मान वाढला, त्यांचे सक्षमिकरण झाले. केवळ महिला घरगुती कामात पुढे राहिल्या नाहीत तर त्या राफेल सुद्धा चालवत आहेत. शासकीय योजनांचा लाभ, तीन तलाक रद्दमुळे मुस्लिम महिलाही भाजपला मोठ्या प्रमाणात मदत करतात, त्यामुळेच भाजपला यश मिळत आहे, असा दावा भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी केला.

भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गणेश बिडकर, प्रदीप देशमुख, निवेदिता एकबोटे, शैलेंद्र चव्हाण, नीलेश गिरमे, संजय आल्हाट, संदीप खर्डेकर आदी यावेळी उपस्थित होते.

शायना एन. सी. म्हणाल्या, राहुल गांधींकडे कोणतेही व्हीजन नाही, कामाचा अनुभव नाही, ते फक्त बोलणारे शेहनशाहा आहेत. तर नरेंद्र मोदी हे कामदार असून, १० वर्षात त्यांनी देश पुढे नेला आहेत कर्नाटकातील प्रज्वल सेक्स स्कॅंडल प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. तो एक सायको आहे. त्याला पाठीशी घातले जाणार नाही. त्याचा आणि राजकारणाचा कोणताही संबंध नाही. मोदी सरकारच्या काळात स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून २० हजार महिला व्यावसायिक झाल्या, शासकीय योजनांमधून महिलांना लाभ मिळाला आहे. सीआरपीएफमध्ये महिलांना संधी मिळत आहे, पंतप्रधान आवास योजनेतील अनेक लाभार्थी महिला आहेत. मुस्लीम महिला देखील भाजपला मतदान करत असल्याने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहेत. भाजप संविधानात बदल करणार असल्याची अफवा काँग्रेस पसरवीत आहेत. काँग्रेसने ८० वेळा घटनेत बदल केला आहे. मोदी सरकारने घटनेत बदल करून तीन तलाक रद्द, ३६० कलम रद्द, महिलांसाठी संसदेत आरक्षण असे महत्त्वाचे व देशहिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मतदार काँग्रेसच्या अफवेला बळी पडणार नाहीत.

त्या अजित पवारांच्या भागीदार
बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. त्यांना उमेदवारी देणे हा परिवारवाद नाही तर त्या अजित पवार यांच्या कामातील भागीदार आहेत. गेल्या अनेक वर्ष त्यांनी विविध विषयांवर काम केले आहे. जर आपण इटलीहून आलेली सून स्वीकारली तर बारामतीमध्ये सुनेला का स्वीकारणार नाही? महिलांचा सन्मान करा, मानसिकता बदला, असेही शायना एन. सी. म्हणाल्या.