मराठा आणि ओबीसींचे ताट वेगवेगळेच हवे – प्रकाश आंबेडकर

परभणी, २७ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु राज्य सरकारने मराठा आणि ओबीसीचे ताट वेगवेगळेच केले पाहिजे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी स्पष्ट केली.

ते म्हणाले, “मराठा आरक्षण आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते मुंबईला गेल्यानंतर हा प्रश्न मिटला, असे वाटू लागले होते. पण तो अजूनही कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सामाजिक असंतोष चांगला नाही. राज्य सरकारने तत्काळ हा प्रश्न मार्गी लावायला हवा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण त्यांना आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये.”

‘मविआ’बाबत निर्णय नाही महाविकास आघाडीत जाण्याचा आमचा निर्णय अजून झालेला नाही. मविआचा लोकसभेच्या ३९ जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजले. आम्हाला त्या बैठकीचे आमंत्रण नव्हते. त्यामुळे त्यांचे आमच्याबद्दल काय ठरले, याचीही आम्हाला माहिती नाही. मात्र, आमची लोकसभेच्या अनुषंगाने उमेदवारांची यादी तयार झाली आहे. आम्हीही सक्षम उमेदवार देणार आहोत, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकरांचा आज पुण्यात मेळावा

वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीच्या समावेशबाबत संपूर्ण निर्णय झालेला नाही. हा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक होत असताना, त्याला आंबेडकर यांनी दांडी मारलेली आहे. दरम्यान, वंचित आघाडीचा आज सत्ता परिवर्तन मेळावा पुण्यात होत आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून यातून वंचितची भविष्यातील वाटचाल निश्चित होणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे लक्ष लागलेले आहे.