मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषण सुरू; राज्य सरकारला दिला इशारा

अंतरवाली सराटी, १० फेब्रुवारी २०२४ : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटीलयांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी,अध्यादेश काढावा या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत उपोषणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यानंतर सरकारने तातडीने हालचाली करत मराठा आरक्षणासाठी १६ फेब्रुवारी विशेष अधिवेशन घेणार असल्याचे जाहीर केली. मात्र, तरी देखील मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्य सरकारकडून दगाफटका झाला तर ही बाब समाजाला परवडणार नाही, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्वाच्या विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, सगेसोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. एकदा अधिवेशन झाले की मग आम्हाला काहीच हालचाली करता येणार नाहीत. नागपुरातील हिवाळी अधिवेशनावेळीही असंच झालं होतं. आमचे प्रश्न काही सुटले नाहीत. आता पुन्हा अधिवेशन होत आहे. आता परत राज्य सरकारकडून दगाफटका झाला तर ही बाब माझ्या समाजाला परवडणारी नाही म्हणून मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. या उपोषणाआधी मराठा समाजाची बैठक होईल. त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात होणार आहे. यावेळच्या उपोषणात औषधोपचार, पाणीही घेणार नाही, असे जरांगे पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे

मोर्चातून काहीच साध्य झाले नाही अशी टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, काही जण स्वतःला अभ्यासक आणि समाजाचे नेते म्हणून मिरवून घेत आहेत. आंदोलनाला काही जण विरोध करत आहेत. परंतु, मागासवर्ग आयोग स्थापन झाला हे या आंदोलनाचे यश नाही का? असा सवाल त्यांनी केला. मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी डाव रचला जात असून यात विरोधक आणि सत्ताधारी दोघेही सहभागी आहेत. या आंदोलनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांचा हात असल्याचे सांगितले गेले परंतु या आंदोलनात फक्त आणि फक्त मराठा समाजाचा हात आहे, असे जरांगे पाटील यांनी काही दिनसांपूर्वी स्पष्ट केले होते.