ठाकरे गटाला गळती; अजून काही नगरसेवक शिंदे गटात
मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबण्याचं नाव घेत नाही. सेनेतील दोन गट पडल्यानंतर अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते, नगरसेवक उबाठा सोडून शिंदे गटात दाखल झाले आहेत. आताही उबाठातील तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. आतापर्यंत ३३ माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले असून आणखी काही माजी नगरसेवकांना गळाला लावत ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठातील तीन माजी नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक ७३ चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक ८८ च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांचा समावेश आहे. या तीनही नगरसेवकांनी उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या उपस्थितीत सेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर धरला.
त्यांच्यासह जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबईतील ठाकरे गटाच्या आतापर्यंत ३३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजप-शिवसेना सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली आहेत, त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईतील रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रतत्न सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांना त्यांच्या प्रभागातील रखडेलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी नक्की विकासनिधी देण्यात येईल. लोकांना सोयीसुविदा पुरवण्यासाठी निधीची कमतरता जाणवरणार नाही, असंही सीएम शिंदे म्हणाले