मस्तच! सलग पाच दिवसांची सुट्टी; २९ सप्टेंबरलाही शासकीय सुट्टी जाहीर

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ : लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता उद्या म्हणजेच २८सप्टेंबरला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या व्यवस्थापनास मदत होण्याच्या उद्देशाने २९ सप्टेंबरलाही शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्यापासून सलग पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे. मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
हिंदु आणि मुस्लिम समाजात जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी राज्यात शांततेचं वातावरण रहावं तसेच पोलिसांना मिरवणुकांचं नियोजन करण्यासाठी शक्य व्हावं, त्यासाठी २९ सप्टेंबर रोजी सूट्टी जाहीर करण्याची विनंती ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.

अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागांत गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.