काका का म्हणजे, काका अजून अध्यक्ष का?
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी देशभर लढत होणार आहे, तर महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची ही सर्वांत मोठी पहिली निवडणूक असल्याने युती आणि आघाडीतील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. विरोधकांना चितपट करण्याकरता योजना आखल्या जात आहेत. तसंच, जुन्या योजना, संकल्पना आणि घोषणांचा पुनर्वापर केला जाण्याची शक्यता आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जॉर्ज फर्नांडीस यांच्या एका घोषणेचा उल्लेख करत शरद पवारांनावर निशाणा साधला. यावरून शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“सका पाटलांचा प्रचार करताना जॉर्ज फर्नांडिस पा पा पा म्हणायचे. पा पा पा म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे. त्या काळात काय डोकं चाललं. तेव्हा तर सोशल मीडियाही नव्हता. आता तसंच काहीतरी काकाका वगैरे करावं लागेल”, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.
अजित पवारांच्या या टीकेवर शरद पवार गटातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कारण पुतण्या गद्दार निघाला, वेळ अशी येईल की वेळ येईल विचारण्याची काका का असे करता? माफ करा चुकी झाली आणि ह्या वेळेस २०१९ सारखी माफी नाही. गद्दारांना माफी नाही!” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचे परतीचे दोर पुन्हा एकदा कापले.
रोहित पवार काय म्हणाले?
“अजितकाका तुमचा हा जुना व्हिडिओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्यापलिकडचा आहे. जे कधीही जमलं नाही ते भाजप फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेतंय, हे दुर्दैव! आणि हो! जमलं तर गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या युवांवर का अन्याय केला जातो? या का? चं उत्तरही त्यांना विचारलं तर बरं होईल!”, असं रोहित पवार म्हणाले
महिला धोरण लागू कोणी केलं? काकांनी केलं. राजकारणात खांद्याला खांदा लावून महिला आज कुणामुळे काम करत आहेत? काकांमुळे करत आहेत. महिला आयोगाची स्थापना कोणी केली? काकांनी केली. संरक्षण दलात महिला कोणामुळे काम करत आहेत? काकांमुळे करत आहेत. म्हणून काकाच हवे आहेत, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली.