“जास्त म्याव म्याव केलं तर…,” नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जाहीर इशारा

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२२: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि सत्ताधारी आमने-सामने असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी जास्त म्याव म्याव केलं, तर ते बंद करण्याची सर्व औषधं माझ्याकडे आहेत असा इशारा त्यांनी दिला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांना जिवंतपणी त्रास दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

“मुरजी पटेल प्रत्येक घरातील भाऊ आहे. काका म्हणून त्यांना ओळखतात. प्रत्येकाच्या मदतीला, सुख दु:खात ते धावून येतात. आपल्याला ते आमदार म्हणून मिळणार आहेत याचा उत्साह सर्वांमध्ये आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत. अर्ज भरण्याआधी मुरजी पटेल यांच्या यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शन रॅलीत ते सहभागी झाले होते.

आम्ही गद्दारांसोबत नाही हे दाखवण्यासाठी ही निवडणूक आहे असं आदित्य ठाकरेंनी बोलल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले “जेव्हा बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत निवडणूक लढवून आमदार झाल्या तेव्हा त्यांचे फोनही यांनी उचलले नाहीत. आताही लटके ताईंचा घाणेरड्या राजकारणासाठी वापर होत आहे. याचं ज्वलंत उदाहरण तृप्ती सावंत आहेत. मातोश्रीत कोणाला किती आदर मिळतो हे तृप्ती सावंत यांना विचारा. तेव्हा कोण गद्दार आणि कोणाला सहानुभुती मिळते यांचं उत्तर मिळेल”.

“ही निवडणूक एकतर्फी आहे. रमेश लटकेंचं काम कोणीही नाकारणार नाही. पण मातोश्रीमध्ये त्यांचा किती अपमान झाला हे त्यांनी मला अंगणेवाडीसाठी जात असताना विमानतळावर सांगितलं होतं. उद्धव ठाकरे अपमान करतात, फोन उलचत नाहीत, भेटत नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. माणूस जिवंत असताना तुम्ही किंमत देत नाही आणि नंतर तुमच्या घाणेरडया राजकारणासाठी कुटुंबाचा वापर करता,” असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला.

“रमेश लटके आज जिवंत असते तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे असते,” असा दावा यावेळी नितेश राणे यांनी केला. ऋतुजा लटके यांना मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले “सर्वात जास्त मानसिक त्रास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटंबाने दिला आहे. याचे अनेक पुरावे आहेत. आदित्य ठाकरेंनी जास्त म्याव म्याव केली तर ते बंद करण्याची सर्व औषधं माझ्याकडे आहेत”.

आदित्य ठाकरे काय म्हणाले आहेत?
“ज्याप्रकारे ही निवडणूक होत आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात राग आणि दु:ख आहे. एखाद्या महिलेला सतवणं किती योग्य आहे? महापालिका आणि खोके सरकार ऋतुजा लटके निवडणूक कशा लढणार नाहीत यासाठीच प्रयत्न करत होते. पण कोर्टाने त्यांना दणका दिला आहे. सर्व निष्ठावंत सैनिक आज येथे आले असून, महाविकास आघाडीचे घटकही आले आहेत,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

“अशा निवडणुकींमध्ये विरोधी उमेदवार देणं योग्य नसतं. पण त्या परिस्थितीतही खोके सरकारने जे खेळ केले त्यातून त्यांचं काळं मन समोर आलं आहे. शिवतीर्थ असो किंवा लटकेंची लढाई, पालिकेवर हुकूमशाहीचा दबाव आहे. हे राजकारण भलतीकडे चाललं आहे. यातून खोके सरकार निर्दयी असल्याचं समोर येत आहे. माणुसकी विरुद्ध खोकासूर अशीच ही लढाई झाली आहे,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

“निवडणुकीच्या आधीपासूनच साम, दाम दंड भेद वापरलं जात आहे. राजकीय यंत्रणा, पालिकेचा गैरवापर करण्यावर यांचं लक्ष होतं. त्यांनी राजीनामा न घेता अडचणी निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला. ते न करताही ही निवडणूक झाली असती,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“आम्ही गद्दारांसोबत नाही हे दाखवण्यासाठी ही निवडणूक आहे. महाविकास आघाडी एकत्र राहील. जे फुटायचे ते फुटले आहेत. आता त्यांना नजरकैदेत ठेवलं असून, प्रत्येकाच्या कार्यालयात नजर ठेण्यासाठी एक माणसू नेमला आहे,” असा दावाही आदित्य ठाकरेंनी केला.