कायद्याची पायमल्ली करायचीच होती, तर निकाल द्यायला इतके महिने का लावले जितेंद्र आव्हाडांची नार्वेकरांवर टीका

मुंबई, १५ फेब्रुवारी २०४: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागेल. अजित पवार गटाकडे ५३ पैकी ४१ आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे. तसेच दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावताना कोणत्याही आमदाराला अपात्र न करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. त्यानंतर शरद पवार गटाकडून या निकालावर जोरदार टीका करण्यात येत आहे. “आज जरी आम्ही अपात्र झालो नसलो तरी एकंदरीत जो निकाल दिला त्यावरून कायद्याची पायमल्ली झाली, हे निश्चित आहे”, अशी टीका शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना यावर टीका केली. “कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा, हे जर शिकायचं असेल तर ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिकवणी वर्ग घेऊ शकतात. एकिकडे निवडणूक आयोगाने म्हटले की, पक्षामध्ये २०१९ पासून वाद सुरू झाले. तर राहुल नार्वेकर म्हणतात २९ जून २०२३ पर्यंत वाद नव्हतेच. शरद पवारच नेते होते. ३० जून २०२३ पासून वाद निर्माण झाले. दोन्ही गटाकडून अध्यक्षपदाला आव्हान दिल्यामुळे मी पक्षसंघटनेवर भाष्य करू शकत नाही, असे ते म्हणाले. पण १ सप्टेंबर २०२२ रोजी शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून ३० जून २०२३ पर्यंत त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हानच दिले गेलेले नाही. तर वाद उरतोच कुठे? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

संविधानाच्या दहाव्या परिशिष्टाकडे मी अतिशय सूक्ष्मदृष्टीने पाहत आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. दहावं परिशिष्ट हे आयाराम-गयाराम पद्धत थांबविण्यासाठी आणलं होतं. पण विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले की, हे ठरविण्याचा अधिकार माझा नाहीच. मग हे सांगण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दीड दोन वर्ष का लावली? असाही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.