मी ७२ हजार कोटीची कर्जमाफी केली, तुम्ही शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहात नाही: शरद पवारांची मोदींवर टीका
पुणे, ३० डिसेंबर २०२३: मी कृषीमंत्री असताना लातूरमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचली. त्यानंतर तिथून त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचलो. त्यांच्याशी संवाद साधला. सावकारीचे प्रकरण असल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाऊन रिझर्व बँकेतून देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर किती कर्ज आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर ७२ हजार कोटी कर्ज माफ केले. पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाही, अशी टीका माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
पुण्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, काल अमरावतीला होते. अमरावती, यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांत १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाचली. मी कृषीमंत्री झालो तेव्हा लातूरमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समजली. मी तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंहांना भेटलो. त्यांना म्हंटले आपण या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटलो. दुसऱ्या दिवशी दिल्लीवरुन नागपूरला आलो, तिथून त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचलो. त्यांच्याशी संवाद साधला. सावकारीचे प्रकरण असल्याचे समजले.
दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाऊन रिझर्व बँकेतून देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर किती कर्ज आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर ७२ हजार कोटी कर्ज माफ केले. पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. मी कृषीमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अमेरिकेतून धान्य मागविण्यासाठीच्या परवानगीची पहिली फाईल आली. मला ही गोष्ट खटकली. तिथून तीन वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली. मागेल तेवढे धान्य शेतकऱ्यांना मिळू लागले. जगातील १८ देशांना भारत धान्य निर्यात करु लागला. पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही. एवढा मोठा कृषी प्रधान देश, पण आम्हाला कृषी मंत्री नाही, अशीही खंत शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
आज अमोल कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रश्न मांडला त्यासाठी मी धन्यवाद देतो. पण हेही सांगतो की त्यांचा हा आक्रोश मोर्चा पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. दिल्लीतही या मोर्चाची दखल घेतली गेली आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये बदल करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना शंकर टक्के यश येईल, असाही आशावाद व्यक्त करत शरद पवार यांनी यावेळी कोल्हे यांचे कौतुक केले.