रायगडाचे माजी आमदार सुरेश लाड व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा दुरावा ?
अलिबाग, २३ मार्च २०२३ : कर्जत येथील खांडपे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी स्पर्धांना कर्जत-खालापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी उपस्थित राहण्याचे टाळले. त्यामुळे लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या रायगड दौऱ्या दरम्यान सुरेश लाड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर कार्यकर्ता संवाद मेळाव्यांपासून ते अलिप्त राहीले होते. लाड भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या यावेळी उठल्या होत्या. काहीकाळ ते अज्ञातवासातही गेले होते. मात्र खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची मनधरणी केली. त्यानंतर लाड यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत आपण पक्षातच राहणार असल्याचे जाहीर केले होते.
लाडांच्या नाराजी नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. घारे यांचा पंक्षातर्गत वाढणारा प्रभाव हा लाड यांच्यासाठी असुरक्षितेची भावना निर्माण करतो आहे. लाड यांना डावलून पक्षाकडून घारे यांना पुढे केले जात असल्याचे चित्र मतदारसंघात निर्माण झाले आहे. ही असुरक्षितेची भावना कुठेतरी लाड यांच्या नाराजीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सुधाकर घारे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी स्पर्धाना जाणे लाड यांनी टाळले असल्याचे राजकीय वर्तूळात बोलले जात आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप