छत्रपती संभाजीनगरमधील सीजीएसएच आरोग्य निरामयता केंद्राचे डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन
मुंबई, २२/०३/२०२३: महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर आणि तामिळनाडूमध्ये कोयम्बतूर येथील केंद्र सरकारची आरोग्य योजना सीजीएचएस आरोग्य आणि निरामयता केंद्रांचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार तर छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रमस्थळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील देखील या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे डॉ. मनसुख मांडवीय यांनी यावेळी बोलताना सांगितले. केंद्र सरकारची आरोग्य योजना सीजीएचएस ही 78 सीजीएचएस शहरांमध्ये आरोग्य निरामयता केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरवते.छत्रपती संभाजी नगर हे केंद्र सरकारची आरोग्य योजना सीजीएचएस उपलब्ध असलेले देशातील 79 वे शहर असेल असे सांगत त्यांनी मराठवाड्यासह या भागातील सर्व केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे अभिनंदन केले.आता 338 अॅलोपॅथिक आरोग्य निरामयता केंद्र तसेच 103 आयुष केंद्रांच्या जाळ्याच्या माध्यमातून सीजीएचएस 15 लाख प्राथमिक कार्डधारकांना आणि 42 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना आरोग्य सेवा सुविधा पुरवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने गेल्या 9 वर्षात अनेक उपक्रम हाती घेतले असून भारतातील आरोग्य सुविधा वेगाने वाढत आहेत असे त्यांनी सांगितले. स्वस्थ भारत या या दृष्टिकोनानुसार केंद्र सरकार नेहमीच कटिबद्ध असुन सर्वांसाठी आरोग्य हे केंद्र सरकारचे प्राधान्य असल्याचे मांडवीय यांनी सांगितले.,छत्रपती संभाजी नगर येथील सीजीएचएस आरोग्य निरामयता केंद्राचे लोकार्पण करत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करत असल्याचे मांडवीय म्हणाले.
आरोग्य क्षेत्रात सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार गतिमानतेने कार्यरत आहे, असे डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले. नवीन ठिकाणी सीजीएचएस आरोग्य निरामयता केंद्र सुरु करावतीत अशी मागणी करणारी निवेदने आमच्या मंत्रालयाला प्राप्त झाली आहेत.याबाबत छत्रपती संभाजी नगर आणि परिसरातील सेवारत कर्मचारी तसेच निवृत्तीधारकांकडून निवेदने देण्यात आली होती., त्यांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे, असे त्या म्हणाल्या . सीजीएचएस अंतर्गत उपचारांसाठी विशेषत: आंतररुग्ण उपचारांसाठी खाजगी रुग्णालयांना सीजीएचएस संलग्न करण्यासाठी सूचीबद्ध करेल, असे त्यांनी सांगितले. डिजिटायझेशनच्या माध्यमातून सीजीएसएचमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत असून कागदविरहित काम होत आहे, देयकांची प्रलंबितता कमी करण्यासाठीही काम सुरु असल्याचे पवार यांनी सांगितले. छत्रपती संभाजी नगर हे केवळ महाराष्ट्र राज्यातील पाचवे मोठे शहरच नाही तर वस्त्र आणि कलात्मक रेशीम कापडासाठीही ओळखले जाते.या शहराचे पर्यटनदृष्ट्या तसेच ऐतिहासिक महत्व असून छत्रपती संभाजी नगर आज औपचारिकपणे सीजीएचएस कुटुंबात सहभागी होत असल्याबद्दल डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आनंद व्यक्त केला.
छत्रपती संभाजी नगर येथे सीजीएसएच केंद्राचे स्वप्न साकार केल्याबद्दल केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आरोग्य आणि निरामयता क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
सीजीएचएस केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवते आणि खालील सेवा पुरवल्या जातात:
सीजीएचएस वेलनेस सेंटर्समधून ओपीडी उपचार आणि औषधे
- सरकारी / संलग्न रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ सल्ला
- सरकारी आणि सीजीएचएस संलग्न केलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची भरती
- सरकारी आणि संलग्न रोगनिदान केंद्रांमध्ये तपासणी
- सीजीएचएस कमाल मर्यादा दर आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार श्रवणयंत्र, खुबा /गुडघा प्रत्यारोपण , कृत्रिम अंग, पेसमेकर,आयसीडी /कॉम्बो डिव्हाइस, सीपीएपी , बाय -पॅप यंत्र , ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इत्यादींच्या खरेदीसाठी झालेल्या खर्चाची परतफेड.
- आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि सिद्ध औषध प्रणाली (आयुष) मध्ये वैद्यकीय सल्ला आणि औषधांचे वितरण.
- आपत्कालीन परिस्थितीत, सीजीएचएस लाभार्थी कोणत्याही रुग्णालयांमध्ये संलग्न असलेल्या किंवा संलग्न नसलेल्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घेऊ शकतात. आणीबाणीच्या परिस्थितीत खाजगी मान्यताप्राप्त नसलेल्या रुग्णालयांमधील उपचारांसाठीच्या खर्चाची परतफेड सीजीएचएस दरांवर विचारात घेतली जाईल.
- लाभार्थी देशातील कोणत्याही सीजीएचएस आरोग्य निरामयता केंद्रांमध्ये जाऊ शकतो.
- निवृत्तीवेतनधारक आणि इतर निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना संलग्न रुग्णालये आणि निदान केंद्रांमध्ये रोकड विरहीत उपचारांची सुविधा आहे.
- कुटुंब कल्याण आणि एमसीएच सेवा
- सरकारी तज्ज्ञांच्या वैध प्रिस्क्रिप्शनच्या आधारे दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी 3 महिन्यांपर्यंत औषधे देणे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप